सामंतांचा अस्त करणार म्हणाऱ्यांची उद्धव सेना येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यातून निम्मी खाली होईल. राज्यातील सर्वांत मेगा पक्ष प्रवेश रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे. आमदार भैय्या सामंत यांच्या वाढदिवसादिवशी झाला तो फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असे सांगत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना जवळ करणार नाही, अशी स्पष्ट भुमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यकारिणी आणि सदस्य नोंदणीबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, आबा पाटील, राजन शेट्ये, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
….तर मताधिक्य १ लाखावर गेले असते – ना. उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला प्रामाणिक काम झाले असते तर माझे मताधिक्य १ लाखाच्या वर गेले असते. पक्षाने तेव्हा शिवदूत नेमले, परंतु ते कुठे गेले ते समजलेच नाही. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या होत्या, परंतु त्या कागदवरच राहिल्या. आता एक कुटुंब म्हणून आपणाला काम करावे लागणार आहे. ज्यांना पद मिळालं आहे, त्यांना काही झाले तरी काम करावे लागणारच. विधानसभेला मते कुठे कमी पडली याचे सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होतील. त्यामुळे जिल्हा परिषद गट, गण, प्रभाग, वार्डनिहाय बैठकांना सुरवात करा. यापुढे कोण जवळचा आणि कोण लांबचा हे चालणार नाही. जनमत असलेल्यालाच उमेदवारी मिळणार, पक्षात अनेकांचा प्रवेश होईल. पक्षवाढीसाठी ते मला करावेच लागणार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे असे स्पष्ट प्रतिपादन ना. उदय सामंत यांनी केले.
राज्याची जबाबदारी माझ्यावर – आता शिवसेना पक्षाच्या संघटनेची राज्याची मोठी जबाबदारी माझ्यावर येणार आहे. त्यासाठी मला राज्यात फिरावे लागणार आहे. राज्यात फिरत असताना स्थानिक पातळीवर पक्ष मजबुतीकडे सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत मला अनेक वाईट अनुभव आले. त्यामुळे निवडणुकीनंतर माझी भूमिका पूर्ण बदलेली आहे. पक्षाच्या विरोधात काम करणार्यांना जवळ करणार नाही. पक्ष वाढीसाठी नवीन मंडळींना घेणार आहे पण जुन्यावर अन्याय होणार नाही हे निश्चित. आता नव्या मंडळींना सुद्धा पुढे आणावे लागेल असे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. उदय सामंत म्हणाले.