23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurराजापुरातील शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी फुंकले रणशिंग

राजापुरातील शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी फुंकले रणशिंग

"माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित आपलं शासन नसून आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ‘अब की बार चारशे पार’ अशी घोषणा केली आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यामध्ये ‘अब की बार ४५ पार’ ही घोषणा आपण पूर्ण करायची आहे. त्यासाठी महायुतीचा धर्म पाळून आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांची अनामत जप्त करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शिवसंकल्प अभियानांतर्गत येथील राजीव गांधी क्रीडांगणावर कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित आपलं शासन नसून आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यासोबत सर्वसामान्यांमधील माणूस मुख्यमंत्री आहे. कोकणी माणसाचा स्वभाव फणसासारखा आहे. कोकण, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे कायमचे अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे हे शिवसेनेचे शरीर असले, तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे शिवसेनेची फुफ्फुसे आहेत. अशा या कोकणाच्या विकासासाठी शासन सकारात्मक असून त्यातून कोकणाला विकासात्मक एक नंबर करण्याची खात्री देतो.

त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते पूर्णत्वास नेण्याचा निश्चितच प्रयत्न करू. मोठ्या संख्येने सभेला असलेली उपस्थिती हीच आमच्या दीड वर्षापूर्वीच्या भूमिकेची पोचपावती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे स्वप्न साकार करण्याचे काम आपण करीत आहोत.” या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेच आता कॅलेंडरमध्ये तारीख शोधतात – जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करणे, अयोद्धेमध्ये प्रभू श्री राम यांचे मंदिर उभारणे हे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम पंतप्रधान करीत आहेत. पंतप्रधान मोंदीनी प्रभू श्रीरामांचे मंदिरही बांधले आणि तारीखही जाहीर केली. त्याबद्दल मोदी यांना बाळासाहेबांनी शाबासकी दिली असती. मात्र, काहीजण प्रभू श्रीरामांवर प्रश्न उपस्थित करीत आहे. प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हा राजकीय विषय नसून आपली अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे. ज्यांनी श्रीराम मंदिर बांधण्याची तारीख सांगा म्हणत होते, तेच आता कॅलेंडरमध्ये तारीख शोधत आहेत, असा टोला शिंदे यांनी लगावला.

RELATED ARTICLES

Most Popular