शहरानजीकच्या शीळ येथे लघुपाटबंधारे विभागाकडून धरणाची उभारणी केली जात असून, त्याला शेतकऱ्यांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. या धरणामध्ये होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे या परिसरातील सुमारे ३७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. या धरणाच्या बांधकामाचे वेगाने काम सुरू आहे. या धरण बांधकामासाठी ज्या शेतकऱ्यांनी जागा दिल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. याकडे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांचे लक्ष वेधले असून जमीन मोबदल्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा अन्यथा धरणाचे काम बंद करा, असा शेतकऱ्यांनी इशारा दिला.
शेतकऱ्यांची आक्रमक मागणी लक्षात घेऊन खासदार राऊत, आमदार साळवी यांनी प्रशासनाला १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या कालावधीमध्ये मोबदल्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास धरणाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही दिला. प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मोबदला, जमिनीचे मुल्यांकन आदी प्रश्न सोडवण्याचे आश्वासित करण्यात आले. या वेळी तहसीलदार शीतल जाधव, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी विद्या पाटील, मंडल अधिकारी बाजीराव पाटील, मोरे, तलाठी गुरव, शीळ सरपंच अशोक पेडणेकर, माजी सरपंच नामदेव नागरेकर आदी उपस्थित होते.
शीळ येथे लघु पाटबंधारे विभागातर्फे धरणाची दोन वर्षांपासून उभारणी करण्याचे काम सुरू आहे. प्रशासकीय मान्यता असलेल्या या धरणाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकामाची खासदार राऊत यांनी आमदार साळवी यांच्यासमवेत पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. सरपंच पेडणेकर यांच्यासह माजी सरपंच नामदेव नागरेकर, कृष्णा नागरेकर, गोपाळ गोंडाळ यांनी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधले.