तालुक्यातील किंजळेतर्फे नातू, पुर्ये, तळे, कुडोशी, सुकीवली या पाच गावांतील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रस्तावित असलेला न्यू मांडवे लघुपाटबंधारे प्रकल्प तब्बल ४० वर्षांनंतर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याची आशा निर्माण झाली आहे. या धरणावर २ मेगावॉटचा वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. त्या पद्धतीने धरणाची निर्मिती होणार आहे. रखडलेल्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास या परिसरातील पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. या धरणाला १९८३ ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली.
मूळ धरण हे ४४५ मीटर व उंची ४९.४५ मीटर आहे तर ओगी पद्धतीचा ९४ मीटरचा सांडवा प्रस्तावित आहे. २०.४३३ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाच्या निर्मितीमुळे पाच गावातील १८७७ हेक्टर जमीन पीक क्षेत्राखाली येणार आहे. धरणाला असणारा उजवा कालवा २१ कि. मी. चा असून १ ते १० कि. मी खुला कालवा आहे. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर ११ ते २१ मधील कामे पीडिएन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. धरणासाठी एकूण ११३.४० हे. क्षेत्राची भूसंपादन कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी २९५. ३४ लक्ष मोबदल्याचे वाटप ही पूर्ण करण्यात आले आहे. कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याचेही वाटप पूर्ण करण्यात आले आहे.
या धरण क्षेत्रामुळे बाधित झालेल्या ८४ कुटुंबांना मौजे तळे आणि मांडवे येथे प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन ठिकाणी प्रकल्प बाधितांना देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधापैकी बऱ्याच सुविधा पुर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धरण पूर्णत्वाच्या मार्गातील अनेक अडथळे आता दूर झाले आहेत. सध्या धरणातील घळभरणीचे काम पूर्ण करण्याचे मुख्य धोरण असून सांड्वा बार तसेच गाईड वॉल कालव्यांचे प्रणालीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. घळभरणी झाल्यास धरणामध्ये पाणी साठवण सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी या प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे आहे.