तब्बल सात तास लेट असलेल्या ट्रेनची तिकिटे प्रचंड मनस्तापानंतर प्रवाशांनी नाईलाजाने कॅन्सल केली असता प्रवाशांच्या रद्द तिकीटांचा परतावा देण्यासाठी ६० दिवसांची मुदत घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर तब्बल सात तास अचानकपणे ट्रेन उशीरा आल्याने काही प्रवाशांना आपल्या पुढील प्रवासातील विमानाच्या तिकीटांचाही हजारो रूपयांचा भुर्दंड टाळण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घेऊन हजारो रूपयांचा खर्च सोसावा लागल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे अशा अनागोंदी रेल्वेसेवेच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की या चारही प्रवाशांनी रत्नागिरी येथून मुंबईची नेत्रावती एक्सप्रेसची कन्फर्म तिकीटे ऑनलाईन पध्द्तीने रेल्वेच्या साईटवरूनच खरेदी केली होती. या प्रवाशांना त्याच रात्री मुंबई एअरपोर्टवरून परदेशी प्रवास करायचा होता. विमानाची वेळ रात्रीची साडेअकराची होती. तर नेत्रावतीची रत्नागिरीची वेळ दिनांक चार रोजी सकाळी सव्वानऊची होती. मात्र ही नेत्रावती रेल्वे रत्नागिरी स्थानकावरच सायंकाळी चारनंतर आली. नेत्रावती तब्बल सात तास लेट दाखल होणार असल्याचे रेल्वेच्या संकेतस्थळावर समजताच या चारही प्रवाशांना मुंबईत पोहोचण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांशिवाय आधारच नव्हता.
अखेर या प्रवाशांनी विमन तिकीटांचा. वाया जाणारा हजारो रूपयांचा नाहक भुर्दंड टाळण्यासाठी वाहनाचे बुकींग केले. रत्नागिरीतील नेत्रावतीच्या नियमित वेळेत तिकीटे रद्द करण्याचा पर्यायही स्वीकारला. मात्र तिकीटे रद्द करतानाच रेल्वेने परताव्यासाठी साठ दिवसांचाकालावधी घेतला. ही तिकीटे वातानुकुलित दर्जाची असल्याने परताव्यापोटी मिळू शकणारी प्रवाशांची मोठी रक्कम दोन महिने रेल्वेच्या तिजोरीत, मुंबईच्या प्रवासासाठी खाजगी वाहनाचा पडलेला हजारो रूपयांचा भुर्दंड, अचानक ट्रेन सात तास लेट झाल्याने प्रवाशांना . झालेला मनस्ताप याचे मोजमाप करता भारतीय रेल्वेच्या सरकारी कारभाराचा फटका मात्र कोणालाही आणि केव्हाही बसू शकतो हे अधोरेखित झाले.