28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...
HomeRatnagiriभाट्ये खाडी आणि मांडवी बंदरच्या येथे गाळामुळे मार्ग बंद होण्याची भीती

भाट्ये खाडी आणि मांडवी बंदरच्या येथे गाळामुळे मार्ग बंद होण्याची भीती

भाट्ये खाडीच्या मुखाजवळील गाळाचा प्रश्न तर गेली दहा-पंधरा वर्ष ऐरणीवर आहे.

भाट्ये खाडी आणि मांडवी बंदराच्या दरम्यान प्रचंड गाळ साचला आहे. यातील गाळ काढला जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मच्छीमारांना नौका नेण्या-आणण्यास भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी गाळ काढू, अशी आश्वासने दिली. परंतु गाळ काढला गेला नाही. राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने या गाळ उपशाचा प्रश्न उचलून धरला आहे. भाट्ये खाडीतील राजिवडा बंदर हे पूर्वी महत्वाचे बंदर होते. या खाडीतून राजीवडा बंदरामार्गे अगदी हातिस, इब्राहीमपट्टमपर्यंत मोठे मचवे व गलबते, होड्या जात असत.

परंतु भाट्ये खाडीच्या मुखासह हातिसच्या पुढे अगदी इब्राहीमपट्टमपर्यंत खाडी गाळाने भरली आहे. भाट्ये खाडीच्या मुखाजवळील गाळाचा प्रश्न तर गेली दहा-पंधरा वर्ष ऐरणीवर आहे. सातत्याने फक्त आश्वासने लोकप्रतिनिधींकडून मिळत आहेत. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने त्या खाडीमध्ये ये- जा करण्यासाठी मच्छीमारांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यावर किंवा भरती- ओहोटीच्या वेळी नौकांचे अपघातही झाले आहेत. यात काही मच्छीमारांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

राजीवडा बंदरासह कर्ला, भाट्ये, फणसोप या गावातील मच्छीमारांच्या नौकाही बंदरात येत असतात. मेरीटाईम बोर्डाकडून मच्छीमारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने शासन दरबारी अनेकदा निवेदने दिली आहे. पावसाळ्यानंतर या गाळाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु हा प्रश्न सुटण्याऐवजी गाळाचा प्रश्न अधिक जटिल होत चालला असल्याने समुद्रात ये-जा करण्याचा मार्गच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मच्छीमार कोअर कमिटी स्थापन अनेक वर्षांचा कालावधी लोटल्यावरही या गाळाच्या प्रश्नाकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब राजिवडा येथील जमातूल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटीच्या लक्षात आली. या राजिवडा कोअर कमिटीने राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या गावांची मच्छीमार संघर्ष समितीची स्थापना केली. राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने या गाळ उपशाचा प्रश्न उचलून धरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular