रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ८५ वर्षांच्या वरील मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. ३४ हजार १११ मतदारांना इच्छा व्यक्त करण्यासाठीचे फॉर्म वाटले. त्यापैकी ३ हजार ५८३ जणांनी घरबसल्या मतदान करण्यास अनुमती दिली. निवडणूक कर्मचारी दोनवेळाच घरी येऊन मतदानाची संधी देणार आहेत. तुम्ही दोन्हीवेळा उपलब्ध झाला नाहीत तर तुम्हाला पुन्हा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. सिंह म्हणाले, जिल्ह्यात मतदान स्लिप वाटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील ८० टक्के स्लिपांचे वाटप झाले आहे. उर्वरित २० टक्के राहिलेले काम दोन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५१ हजार ६३० मतदार आहेत. त्यापैकी ७८.०४ टक्के स्लिप वाटपाचे काम झाले आहे.
ठिकठिकाणी नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या मतदारसंघात ६ हजार ५३४ मतदार आहेत. त्यापैकी २ हजार २३ मतदारांनी हे पोस्टल मतदान केले. मतदारसंघामध्ये ८५ च्यावर वय असलेल्या मतदारांना घरामध्ये मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासाठी ३४ हजार १११ मतदारांना घरबसल्या मतदान करण्यासंदर्भातील फॉर्म वाटप केले आहेत. त्यापैकी ३ हजार ५८३ मतदारांनी अशा पद्धतीने मतदान करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यासाठी पथक त्यांच्या घरी जाऊन हे मतदान करून घेणार आहे.
ही टीम एक ते दोनवेळा जर तुम्ही मतदानासाठी उपलब्ध झाला नाहीत तर तुम्हाला पुन्हा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही. कारण, तुम्ही घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे तुम्हाला मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही, असा निवडणूक आयोगाचा नियम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार संघातील एकूण मतदान केंद्राच्या ५० टक्के केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.