तालुक्यातील नाटे पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल व अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.२०) रात्री घडली आहे. त्यामध्ये मोबाईल हॅण्डसेटसह रोख रक्कम मिळून सुमारे १० लाख रक्कमेचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे पुढे आले. या घटनेमुळे नाटे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. चोरट्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र, चोरट्यांना शोधण्यात त्याला अपयश आले. नाटे सडापेठ बाजारपेठेतील एसटी स्टँड नजीकच नासीर काझी यांची जैद मोबाईल शॉपी आहे.
हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे शॉपीचे मालक काझी यांच्या बुधवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामध्ये दुकानातील मोबाईलचे हॅण्डसेट आणि रोख रक्कम ठेवलेले लॉकर चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान ही माहिती त्यांनी नाटे पोलिसांना दिली. त्यानुसार, नाटेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदारी आणि सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, डीवायएसपी केडगेही घटनास्थळी दाखल होवून त्यांनी पाहणी केली. दरम्यान, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक मागवले होते. मात्र, चोरट्यांना शोध घेण्यात श्वान पथकाला अपयश आले आहे.
दरम्यान, या चोरीप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती नाटे पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांत नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यापूर्वी श्रमिक सहकारी पतपेढीत झालेली कोट्यावधीची चोरी, त्यांनंतर झालेली घरफोडी आणि आता लागोपाठ घडलेल्या या दोन चोरीच्या घटना यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाटे बाजारपेठेत सीसीटीव्ही बसविलेले असतानाही नाटे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्याने नाटे पोलिसासमोर आव्हान उभे राहिले आहे.