केवळ भावनिक राजकारण करून आणि खोटी आश्वासने देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काहीच विकासात्मक काम करू शकलेले नाहीत. आपली निष्क्रीयता झाकण्यासाठी आता आमच्यावर आरोप करीत आहेत. आमची निष्ठा विचारत आहोत. मात्र, ज्यांनी सन २००४ च्या निवडणुकीपासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपली निष्ठा विकली त्या गद्दारांनी मला निष्ठा शिकवू नये, अशी घणाघाती टीका उदयोगमंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांचे नाव न घेता केली.
राजापुरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (ता. २२) मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पालकमंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, माझ्या निष्ठेवर हे बोलतात यांची पात्रता तरी आहे का? आमच्यावर बोलण्याची. सन २००४ च्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्ही निष्ठा कशी विकलात, कोणाला भेटलात, कुठल्या हॉटेलमध्ये भेटलात हे जाहीर करू का? निष्ठेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांची कुंडली आमच्याकडे आहे.
अगदी तेव्हापासून आजपर्यंत कशा प्रकारे गद्दारी तुम्ही केलीत हे आपल्याला चांगले ठाऊक आहे, खोटा आक्रमकपणा दाखवायचा, नाटकं करायची, जनतेची दिशाभूल करायची हाच आता त्यांचा कार्यक्रम आहे. जर आक्रमकता दाखवायची होती तर ती प्रांत कार्यालय निर्मितीसाठी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी, इथल्या जनतेच्या दाखवयाची होती. विकासासाठी आक्रमकता डोक्याची हवी, विचारांची हवी, विकासाची हवी.