चिपळूण येथे नीलेश राणे व भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नुकत्याच झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. पोलिसांची ही एकतर्फी कारवाई सुरू आहे. याबाबत अपर पोलिस अधीक्षकांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर जरूर कारवाई करा, पण अट्टल गुन्हेगारांना सोडायचे आणि निरपराध नागरिकांना पकडायचे, असे जर पोलिसांनी चालू ठेवले, तर आम्ही हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्यात अटक करून घेऊ, असा इशारा उबाठाचे नेते, खासदार विनाकय राऊत यांनी दिला. रत्नागिरी येथे कार्यक्रमानिमित्त आलेले खासदार राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ‘नुकतेच भाजपचे तथाकथित नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी चिपळूण येथे येऊन त्यांच्या गुंडांच्या साथीने आमदार भास्कर जाधव यांचे कार्यालय व कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता.
त्यांनी आपल्या हिडीसपणाचे दर्शन घडवले होते. त्या प्रकरणी दबावाखाली पोलिसांनी एकतर्फी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करायला सुरुवात केलेली आहे. नीलेश राणे यांच्या ज्या लोकांनी पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या आणि तिथल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड केली, त्या गुंडांना अद्यापही पकडण्यात आलेले नाही. पोलिसांची या प्रकरणी एकतर्फी कारवाई सुरू आहे. मी येथील अपर पोलिस अधीक्षकांना भेटून यासंबंधीची वस्तुस्थिती त्यांना सांगितलेली आहे.’ जे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जरूर कारवाई करा; पण अट्टल गुन्हेगारांना सोडून निरपधार नागरिकांना पकडू नका, असेही त्यांना सांगितले आहे.
अट्टल गुन्हेगारांना अटक करा – अट्टल गुन्हेगारांना सोडायचे आणि निरपराध नागरिकांना पकडायचे, असे जर पोलिसांनी सुरू केले आहे, तर हे चुकीचे असून, काही दिवसांमध्ये पोलिसांना आम्ही हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्यामध्ये दाखल होऊन अटक करायची मागणी करू, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.