दागिने आणि पैशांच्या हव्यासापायी एका इसमाची हत्या करून सोनसाखळीसह ऐवज लंपास करणाऱ्या तिघांना खेडच्या अतिरिक्त सुत्रन्यायाधीश श्री.पी.एस. चांदगुडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अभिजित सुधाकर जाधव (वय, २७ रा.गवये, ता.दापोली), नरेंद्र संतोष साळवी (वय, २८) आणि अक्षय. विष्णू शिगवण (वय, २८, रा. बोडीवली, ता. दापोली) अशी शिक्षा ठोठावल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड, कलम ३९७अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३९२ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड, कलम १२० ब अंतर्गत जन्मठेप सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड कलम २०१ नुसार जन्मठेप व सश्रम कारावास ५ हजार रुपये दंड तसेच प्रत्येक कलमासाठी ३ महिने साधी कैद ठोठावण्यात आली आहे. आरोपींकडून मिळणाऱ्या दंडापैकी २० हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून द्यावयाची असून उर्वरित रक्कम सरकारकडे जमा करायचे आदेश दिले आहेत.
या ३ आरोपींना राजाराम बाळकृष्ण चव्हाण यांची आर्थिक हव्यासापोटी हत्या केली होती. मोबाईलचे बनावट सिमकार्ड वापरून त्यांना टाटा मॅजिक गाडी घेऊन बोलावण्यात आले आणि सुरा आणि दगडाने हल्ला करून त्यांची हत्या केली. मृतदेह पुलाखाली सिमेंटच्या पाईपमध्ये टाकून लपविण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन लंपास केले असे आरोप होते. या प्रकरणी एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मुनाल जाडकर यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक हरिचंद्र पवार, महिला पोलिस हवालदार वैशाली सुकाळे यांचे या कामी सरकार पक्षाला सहकार्य मिळाले.

 
                                    