रत्नागिरीत सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करुन सुधारीत नळपाणी योजना राबवण्यात आली. रत्नागिरीतील नागरिकांना यापूर्वी दिवसातून दोन वेळा पाण्याचा चांगल्या फोर्सने पुरवठा करण्यात येत होता. मात्र आता पाणी पुरवठा एकच वेळ करण्यात येणार आहे. असे असले तरी जो आधी अर्धा तास पाणी पुरवठा केला जायचा, तो आत्ता दीड ते दोन तास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल, असे नगर परिषदेने म्हटले आहे. मात्र कोणत्या भागात केव्हा पाणी येईल याचे वेळापत्रक निश्चित नसल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसाय होणार आहे. पण ते सुद्धा लवकरच कळवण्यात येईल.
शहरवासियांना नवीन पाणी योजनेमुळे निदान दोन वेळ तरी मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती. मात्र घडले मात्र उलटेच, दोन वेळ सोडा आता एका वेळेच पाणी मिळणं कठीण झालं आहे. राजापूरकर कॉलनी आणि एकता मार्ग या भागात गेले दोन दिवस पाणी नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नवीन पाणी योजना येवूनही पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
वारंवार फुटणारी वाहिनी, गळतीचे प्रमाण तसेच जीर्ण झालेल्या वाहिन्या यामुळे गेले ४ वर्षे शहरात सुधारीत पाणी योजना राबवली जात आहे. त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. ६३ कोटीची ही पाणी योजना वाढीव दरामुळे आता ७२ कोटीवर गेली. या पाईपलाईनचे काम इतके वर्षे चालू आहे तरी पूर्णत्वास गेले नाही. अंतिम टप्प्यात काम आहे असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु पूर्ण कधी होणार आणि नागरिकांना मनसोक्त पाणी मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.