स्थानिक जनतेने रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याने या प्रकल्पाऐवजी पर्यावरणपूरक दोन मोठे उद्योग आणून येथील युवक-युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवणे यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी राजापूरात पत्रकार परिषदेत विषद केले. श्री. सामंत यांच्या या भूमिकेमुळे रिफायनरीचा मुद्दाच संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. निष्ठा ही मतदारसंघातील जनतेशी व त्यांनी गेल्या १५ वर्षांत विकासाच्या आशेने दाखवलेल्या विश्वासाप्रती हवी होती मात्र ती राजकीय असेल तर मतदार असलेल्या जनतेला त्याचा फायदा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निष्ठा ही राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासाशी निगडीत हवी. ती पाहता गेल्या पंधरा वर्षांत या मतदारसंघातील जनतेच्या दैनंदिन जीवनमानात काही फरक पडलेला असेल तर विचार करण्याची ही संधी येथील सुज्ञ मतदारांना आलेली आहे.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ सतत भावनेच्या राजकारणावर स्वार होऊन स्वतःसह अनेक पिढ्यांचे नुकसान करतो याचे प्रत्यंतर आलेले असताना येथील ओस पडत चाललेली गावे-बाजारपेठांच्या प्रश्नासह स्थानिक जनतेच्या शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा आणि रस्ते पाण्यासह सर्वच पायाभूत सुविधांची असलेली दुरवस्था बघून महायुती शासनाने शेकडो कोटींचा निधी दिला आहे. दुर्दैव म्हणजे अशी दुरवस्था पाहून हा निधी दिला म्हणून स्थानिक आमदारांची एकाच मतदारसंघात किंबहुना आपल्याच मतदारसंघात अधिक निधी दिला म्हणून देखील भावनिक तक्रार आहे. त्यामुळे यांची निष्ठा मतदारसंघाशी आहे की फक्त राजकीय आहे ? असा सवाल श्री. किरण सामंत यांनी उपस्थित केला.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा आहेच शिवाय आरोग्याच्या सेवेबाबत तर येथील जनता रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, मुंबईवर अवलंबून आहे. यासाठी विद्यमान महायुती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजितदादा पवार यांनी ओणी येथे मल्टीस्पेशालिटी रूग्णालय खास बाब म्हणून मंजूर केले आहे. यासाठी आपला सततचा पाठपुरावा सुरू होता. महाविकास आघाडी शासनाच्या काळात राज्यात विभागात एक
मल्टीस्पेशालिटी रूग्णालय असे धोरण पुढे करून तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रस्ताव लाल फितीत गुंडाळून ठेवला होता त्यावेळी निदान उपजिल्हा रूग्णालय तरी मंजूर करा अशी विनवणी राजन साळवी करीत होते याकडे किरण सामंत यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आगामी काळात असे सुसज्ज रूग्णालय राजापूरकरांना हवे असणारच असा दावा त्यांनी केला.
इंजिनियर झाल्यानंतर सन १९९६ साली माझ्या उद्योग व्यवसायाची सुरूवात मी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातूनच केलेली आहे. त्यामुळे गेली २५ वर्षे माझी नाळ या मतदारसंघाशी आणि येथील जनतेशी, संस्थांशी जुळलेली आहे. त्यामुळेच येथील जनतेशी निर्माण झालेले पारिवारिक नाते मी ऋणानुबंधाने जपले आहे. या मतदारसंघाने ज्या उमेदवाराला तीनवेळा संधी देऊन आपल्या आयुष्यातील महत्वाच्या कालावधीची संधी दिली त्याचे फलित म्हणून येथील जनतेच्या दैनंदिन जीवनमानात काय फरक पडला आहे याचा विचार न केल्यास तो पुन्हा आत्मघात ठरणार आहे असे सामंत म्हणाले. विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ कोसो दूर आहे. त्यामुळे येथे एका हक्काच्या आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीची गरज असल्याचे ‘आपल्या लक्षात आले. केवळ यासाठीच आपली उमेदवारी आहे असे श्री. सामंत यांनी सांगीतले.