जिल्ह्यात गुहागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाला गालबोट लागले आहे. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन कुटुंबातील चौघंजण बुडाले यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. मात्र एका कुटुंब प्रमुखाचा बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. मुंबईतील पवई येथून हे कुटुंब गुहागरमध्ये पर्यटनासाठी आले असताना समुद्रात पोहताना शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शहरातील वरचापाट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर भर दुपारी दोन कुटुंबातील ४ जण पाण्यात उतरले होते. त्यापैकी ४२ वर्षीय अमोल विजयकुमार मुथा यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर दोन मुले आणि एका महिलेला गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सच्या दोन कर्मचाऱ्यांनी वाचविले. ही घटना २७. डिसेंबरला दुपारी ११.४५ ते १२.१५. च्या दरप्यान घडली.
सध्या नाताळच्या सुट्ट्या असल्याने गुहागरमध्ये पर्यटकांची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई रहाणारे कांचन विजयकुमार मुथ्था, अमोल विजयकुमार मुथ्था, श्वेता अमोल मुथ्था आणि विहान अमुल मुथ्था हे कुटुंब २४ डिसेंबरला सायंकाळी गुहागरमध्ये दाखल झाले. अमुल मुथ्था व श्वेता मुथ्था सॉफ्टवेअर इंजिनिअर असून दोघेही मुंबईत नोकरी करतात. मुळगाव पुणे नाताळची आठ दिवसांची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी त्यांनी गुहागरजवळ जोशी होमस्टेमध्ये मुक्काम केला होता. श्वेता मुथ्था यांची पिंपळे सौदागर, पुणे येथे रहाणारी बहिण सौ. सोनल सिंघवी ही पती पंकज सिंघवी आणि मुलगी सिया सिंघवी यांच्यासह २६ डिसेंबरला गुहागरला आली. सिंघवी कुटुंब शहरातील राजगड हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. २६ डिसेंबरला रात्री सिंघवी व मुथ्था कुटुंब एकत्र आले त्यावेळी त्यांनी २७ डिसेंबरला दुपारी समुद्रावर पोहायला जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुथ्था कुटुंब आणि सिंघवी कुटुंब २७ डिसेंबरला दुपारी ११.४५ च्या दरम्यान हॉटेल राजगडच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले.
पंकज सिंघवी आणि सोनल सिंघवी समुद्रकिनाऱ्यावर वाळुत थांबले होते. तर अमोल मुथ्था (वय ४२), श्वेता मुथ्था (वय ४२), विहान मुथ्था (वय १३) आणि सिया सिंघवी (वय १९) हे चौघे समुद्रात पोहायला गेले. पाण्यात खेळता खेळता अमोल मुथ्था खोल पाण्यात गेले. त्यांनी पुन्हा किनारा गाठण्यासाठी पोहायला सुरवात केली. मात्र त्यांची दमछाक झाली. अन्य तिघे देखील अमुल मुथ्था यांच्यापासून थोड्या अंतरावर होते. सिया सिंघवीने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरवात केली. याच काळात पवारसाखरी येथील अक्षय पवार सहज फिरायला समुद्रावर आले होते. त्यांनी पर्यटकांची ओरड ऐकली आणि सोहम सातार्डेकरला फोन करुन मदतीसाठी बोलावले. सोहमने नगरपंचायतीचा कर्मचारी आशिष सांगळे याला फोन केला. आशिष आणि सोहम समुद्रावर येत असतानाच त्यांनी जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सचे मालक उमेश भोसले यांना फोन केला. याच काळात पोलीसांपर्यंतही बातमी पोचली.
प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्मधील कर्मचारी मुजाहुद्दीन मिरकर व सद्दाम बागकर असे तिघेजण जेट स्की घेवून समुद्रातून हॉटेल राजगडच्या मागे समुद्रातून आले. त्यांनी बेशुध्दावस्थेत असलेल्या अमोल मुथ्था यांच्यासह श्वेता मुथ्था, विहान मुथ्था आणि सिया मुथ्था यांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि आशिष सांगळे यांनी अमुल मुथ्थांना सीआरपीची ट्रीटमेंट दिली. तोपर्यत गुहागरचे पोलीसही तेथे पोचले होते. बेशुध्द अवस्थेतील अमुल मुथ्था यांना तत्काल वाहनाने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अमोल मुथ्था यांना मृत घोषित केले.

