अनेक चाकरमानी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आंबे, काजूचा आस्वाद घेण्यासाठी, फिरण्यासाठी कोकणात धाव घेतात. आत्ता पावसाची चाहूल लागल्याने, उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आल्याचे दिसून येते आहे. चाकरमानी देखील परतीच्या वाटेला लागले आहेत.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्यामुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या गावी आले आहेत. उन्हाळी सुट्टीची मजा अनुभवायला मुंबईकर आपल्या गावी येत असतात. आता सुट्ट्या संपत आल्याने काही चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. कोकण रेल्वे कायमच बहुतांश वेळा हाऊसफुल्ल असते. महिनाभर रेल्वे गाड्यांचे तिकिट बुकींग फुल्ल झाले असून, सर्वच गाड्यांची तिकिटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतीक्षेत आहेत. तर काही गाड्यांची वेटींगलिस्ट देखील फुल्ल झाल्याने बुकींग बंद करण्यात आले आहे.
सध्या रेल्वे स्थानकावरील तिकिट केंद्रावर प्रवाशांची तिकिटांसाठी मोठी गर्दी होत असून तिकिट केंद्रासमोर तासनतास प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे. कोरोना काळानंतर कोकण रेल्वेने पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावी दाखल होत आहेत.
कोकण रेल्वेने मुंबई व कोकण असा प्रवास सुखकर आहे. मात्र दापोली, मंडणगड, गुहागर जिल्हयातील या तीन तालुक्यांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. तरीही या तालुक्यातील अनेक नागरिकांना कोकण रेल्वे प्रवास हा मोठा सुखकर प्रवास ठरतो. गर्दीच्या हंगामात सर्वसामान्य जनतेला परवडणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे अनारक्षित डब्यासहित कायमस्वरूपी सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.