मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीने हैराण व्हायला झालेले. २०२१ वर्ष सुद्धा अर्धे त्यातून सावरण्यातच गेले. अनेक सुखद , दुखद प्रसंगांनी हे वर्ष सुद्धा सरत चालले आहे. या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण सध्या आहोत. प्रत्येक जणांचे नवीन वर्षाचे काहीतरी प्लान्स असतात, नवीन ठिकाणी जाणे, काहीतरी नवीन शिकणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे इत्यादी अनेक.
३१ डिसेंबरची रात्र सरून नवीन वर्षाची सुरुवात कायमच आल्हाददायक असते. त्यामुळे ३१ डिसेंबरचा सरत्या वर्षाचा निरोप आणि १ जानेवारी २०२२ च्या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात संपुष्ट आल्याने आणि लसीकरणा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने यंदाही थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांकडून कोकणाला विशेष पसंती मिळत आहे.
यंदा २० ते २५ डिसेंबर या कालावधीत एमटीडीसीचे ७५ टक्के आरक्षण फुल झाले असून, २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीसाठी ९५ टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसात ते १०० टक्के होईल असा विश्वास एमटीडीसीच्या अधिकार्यांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून अनेक पर्यटकांनी गणपतीपुळेतील एमटीडीसी बरोबरच स्थानिक लॉजिंगमध्ये ख्रिसमससाठी आरक्षण सुरु केले आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस गणपतीपुळेत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कालावधीमध्ये एसटी सुरु झाल्या तर ही सुविधा सामान्य वर्गातील पर्यटकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
रेल्वे सेवेन रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांना खासगी वाहतूकीचा आणि रिक्षांच्या वाढीव भाड्याचा भुर्दंड सोसावा लागतो. सध्या शनिवारी, रविवारी बर्यापैकी पर्यटक दाखल होत असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सणासुदीला कोकणातील पर्यटन व्यवसायाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.