ऐन पर्यटन हंगामात लागलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. मे महिन्यातील आणि आता ऐन दिवाळीच्या काळात लागलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायास बसणार असून, कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक नाराज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मार्च, एप्रिलमध्ये पालिका त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे त्या काळातही आचारसंहितांमुळे येथील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मे महिन्यात आचारसंहिता लागली. ऐन हंगामात आणि शालेय सुट्यांच्या काळात लागलेल्या या आचारसंहितेमुळे पर्यटकांनी येथे पाठ फिरवली. परिणामी, मे महिन्यातील पर्यटन हंगाम वाया गेला. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी ऐन दिवाळी सणातच आचारसंहिता लागली आहे.
त्यामुळे दिवाळी सुटीत येथे येणारा पर्यटक हा निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत येथे येऊ शकत नाही, तोपर्यंत शाळांची सुटी संपणार असल्याने दिवाळीतील मोठा पर्यटन हंगाम वाया जाणार असल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. मागील काही वर्षे पूर्व किनारपट्टीवरील वादळे ही पश्चिम किनारपट्टीवर धडकू लागली आहेत. याचा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास मोठ्या प्रमाणात बसला आहे. वादळसदृश परिस्थिती, समुद्रांतर्गत सातत्याने होत असलेला बदल, अवकाळी पाऊस याचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटनावर झाला आहे. पर्यटन हंगामासाठी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक नेहमीच पर्यटकांना अत्यावश्यक, दर्जेदार सुविधा देण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहावयास मिळाले; मात्र वादळसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे म्हणाव्या त्या प्रमाणात पर्यटक दाखल न झाल्याने त्याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसली आहे. वर्षातील शंभर दिवस पर्यटनाचें असतात. त्यातील यावर्षी ४० हून अधिक दिवस हे आचारसंहितेत गेले.
प्रतिदिन ७० हजार पर्यटकांची हजेरी – दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीमध्ये प्रतिदिन ६० ते ७० हजार पर्यटक दाखल होत असतात. त्यामध्ये एकट्या गणपतीपुळेमध्ये २५ हजार पर्यटकांची हजेरी असते. दिवाळीच्या सुटीत शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात फिरायला बाहेर पडतात. निवडणुकीमुळे हा वर्ग यंदा बाहेर पडणे शक्य नाही.