कोण कोणत्या पक्षात गेला, या संदर्भात आता बोलणे उचित नाही; परंतु महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बैठकीत सूचना दिल्या आहेत की, जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. तसा निर्धार आज महायुतीने केला आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गुहागर विधानसभेची जागा आणि बाळ मानेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. या वेळी महायुतीतील शिवसेनेचे रत्नागिरीतील उमेदवार उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण ऊर्फ भैया सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘सकाळी आठ वाजल्यापासून बुधवारी महायुतीच्या बैठका सुरू आहेत.
यामध्ये भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांची मते जाणून घेतली; परंतु महायुतीमध्ये सर्वांना एकत्र काम करायचे आहे. महायुतीचे कार्यकर्ते ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत. लोकसभेला निवडणुकीमध्ये ताकदीने लढल्यामुळे महायुतीला चांगले यश मिळाले. त्या पद्धतीचे यश आपल्याला विधानसभेला मिळवायचे आहे तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. संघटनात्मक बैठकीमध्ये सर्वांनी आज तसा निर्धार केला. कोणत्या एका जागेसाठी नाही तर पाचही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही लढणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय, या प्रश्नावर रवींद्र चव्हाण म्हणाले. या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. या संदर्भात आताच बोलणे उचित नाही; परंतु महायुतीचे उमेदवार जिंकून यावे यासाठी सर्वांना सूचना दिल्या आहेत.