गणपतीपुळे येथून रत्नागिरीमार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या पर्यटकांवर साखरतर पुलावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ६ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन मुलींचा समावेश असून जीवाचा आकांत करीत त्यातील दोन लहान मुलींनी साखरतर पुलावरच लोळण घेतली होती. कोल्हापूर येथून काही पर्यटक कारवांचीवाडी येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. बुधवारी सकाळी दोन जोडपी आपल्या मुलींसह मोटरसायकलवरून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेली होती. गणपतीपुळे येथील देवदर्शन व समुद्राचा आनंद लुटल्यानंतर ते पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले होते.
मोह आवरला नाही – साखरतर येथील पुलावर आल्यानंतर म्हामूरवाडी व काळबादेवीच्या दिशेने वाहणारी खाडी आणि या खाडीमध्ये उभ्या असणाऱ्या मासेमारी नौका साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत असतात. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही दोन्ही जोडपी आपल्या मुलांसह दुचाकीने साखरतर पुलावर आले. तेथील दृष्य पाहून त्यांचा निसर्गसौंदर्य पाहण्याचा मोह आवरला नाही.
पुलावर गेले – पुलाच्या एका बाजूला दुचाकी उभ्या केल्यानंतर ते सर्वजण पुलावरून काळबादेवींच्या दिशेने खाडीत उभ्या असलेल्या मासेमारी नौका पाहत होते. मोबाईलवरून फोटो काढले तर सेल्फीदेखील घेतले. फोटो घेण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक सारेजण धावू लागले.
मधमाशांचा हल्ला – साखरतर पुलावर ज्या ठिकाणी हे पर्यटक आपल्या मुलांना घेऊन उभे होते तिथेच खाली मधमाशांचे भलेमोठे पोळे तयार झाले होते. त्याचा अंदाज त्या पर्यटकांना नव्हता. खाडीतील दृष्य मोबाईलमध्ये टिपत असताना अचानक मधमाशा उसळल्या आणि पुलावर उभ्या असलेल्या पर्यटकांवर त्या मधमाशांनी हल्ला चढवला.
त्या दोघींनी लोळण घेतली – त्या दोन्ही जोडप्यांसोबत दोन लहान मुली होत्या. त्या मुलींवरदेखील मधमाशांनी जोरदार हल्ला चढवला. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर त्या दोन्ही मुली मोठमोठ्याने ओरडू लागल्या. जीवाचा आकांत करीत त्या दोघींनी साखरतर पुलावर अक्षरशः लोळण घेतली. पुलावर अचानक आरडाओरड सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.
टाहो फोडला – अचानक भल्यामोठ्या पोळ्यातून मधमाशा उसळल्या आणि त्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. एकीकडे दोन मुलींना वाचवण्यासाठी आई-वडिलांची धडपड सुरू होती तर त्याचवेळी मधमाशा त्या जोडप्यांवर तुटून पडल्या. वाचवा, वाचवा असा टाहो त्यांनी फोडला होता.
रिक्षा चालकांचे धाडस – साखरतर पुलावर मधमाशांनी हल्ला केल्यानंतर पर्यटक जीवाचा आकांत करीत असल्याचा प्रकार साखरतर येथे रिक्षा स्टॉपवर उभ्या असलेल्या दोन रिक्षा चालकांनी पाहिला. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले आणि त्याचवेळी मधमाशा घोंघावत असताना व त्यांना दिसून आल्या. मधमाशांनी हल्ला केल्याचे लक्षात येताच रिक्षातील रुम लव सीटखाली बसायला असलेल्या बेडशीट तोंडाला गुंडाळून दोन रिक्षा चालक त्या पर्यटकांच्या मदतीसाठी धावले.
मुलींच्या चेहऱ्यावर रुमाल गुंडाळले – त्या दोन मुली जीवाचा आकांत करीत पुलावर लोळण घेत असतानाच गाडीतळ रिक्षा स्टॉप येथील रिक्षा – चालक सुनील साळवी व सागर चव्हाण या दोघांनी त्या दोन लहान मुलींना वाचविण्यासाठी पुढे धाव घेतली. दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून त्यांना उचलून घेत पुलावरून धाव मारली.
जिल्हा रूग्णालयात दाखल – या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या दोन जोडप्यांसह त्यांच्या दोन्ही मुलींना रिक्षा चालक सुनील साळवी व सागर चव्हाण यांनी आपल्या रिक्षातून तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणले. या चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.