मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशोत्सवापर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले असले तरी गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र सिंगल लेनवरून वाहतूक सुरू झाल्यास अपघाताचा धोका कायम आहे. नुकतेच त्यांनी परशुराम घाटाची पाहणी केली; मात्र सिंगल लेनवर वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचा धोका जास्त आहे. कारण, मागील अपघाताचा विचार केला तर मुंबईत वाहन चालवण्याची सवय असलेल्या आणि कोकणातील वळणावळणाचे रस्ते माहीत नसलेल्या वाहनचालकांकडून अपघात व्हायचे. काही अपघात वाहनचालक साखर झोपेत असताना व्हायचे. सिंगल लेन सुरू केल्यानंतर एका लेनवरून वाहने ये-जा करणार आहेत.
सिंगल लेन पूर्णपणे सिमेंट काँक्रिटचे असणार आहे. गणेशोत्सवात रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असणार आहे. खड्डेमुक्त रस्त्याचा आनंद घेताना वाहनचालक घरी लवकर पोहोचण्यासाठी वाहनांची गती वाढणार त्यामुळे एका लेनवरून दोन्ही बाजूची वाहने मार्ग काढताना अपघात होण्याचा धोका जास्त आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुंभार्ली घाटाची पाहणी करताना पावसाळ्यात हा घाट धोकादायक होण्याची शक्यता वर्तवली आहे. या घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या चिरणी आंबडस मार्गाचे, नूतनीकरण करण्यात आले आहे. अपघात रोखण्याचे उपाय सावर्डे, आरवली, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर मार्गावरील मार्गाची मंत्र्यांनी पाहणी केली.
वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. पात्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीतून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या ठिकाणी तसेच इन्सुली येथे पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. कणकवली वागदे फाटा हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी मोठे अपघात होतात. ते रोखण्यासाठी मोठे आरसे लावण्याची सूचना करण्यात आली आहे. कुडाळ येथील आरएसएन हॉटेलनजीक होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक बेट तयार करण्यात येणार आहे.