रत्नागिरीप्रमाणेच लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यालादेखील मुसळधार पावसाने झोडपून काढले असून तेथील पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी सायंकाळी पावसामुळे रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. मलकापूरजवळ केंजळे गावी रस्त्यावर पाणी आल्याने ही वाहतूक बंद पडल्याचे वृत्त हात्ती आले आहे.
पावसाचा जोर ओसरत नसल्याने पाणी ओसरून वाहतूक कधी सुरळित होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने खोळंबली होती. यामुळे शेकडो प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले होते. दरम्यान पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम जनजीवनावर झालेला पहायला मिळतो आहे.