अणुस्कूरा घाटात शनिवारी पहाटे कोसळलेल्या दरडीमध्ये मोठमोठे दगड ब्लास्टिंगद्वारें फोडण्याचे काम अविरत सुरू होते. मात्र तब्बल ६० तासानंतर या घाटातील दरड हटवून वाहतुक पूर्ववत करण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी ६वा.च्या सुमारास हा घाटरस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला. भले मोठ दगड दरडीसोबत घाटातील रस्त्यावर आले असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात बांधकाम विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जवळपास ३ दिवस लोटले तरी अणुस्कूरा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली नव्हती.
दरम्यान आधी घाटातून एकेरी वाहतूक सुरू करताना काही वाहने सोडण्यात आली. तथापी ब्लास्टिंगच्या कामामुळे नंतर ती थांबवण्यांत आली होती. शनिवारी पहाटे अणुस्कूरा घाटात दरड कोसळली आणि घाटमार्ग बंद पडला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते. गेले २ दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोसळलेल्या दरडीमधून रस्त्यावर येऊन पडलेल्या मोठेमोठे दगड ब्लास्टिंग करून फोडण्याचे काम सुरू असल्याने गेले ३ दिवस अणुस्कूरा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. 3
ही वाहतूक पर्यायी मार्ग वळविण्यात आली होती. सोमवारी दुपारनंतर अणुस्कूरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू करताना काही वाहने घाटातून सोडण्यात आली. मात्र ब्लास्टिंगचे काम पूर्ण झाले नसल्याने नंतर वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सायंकाळी घाट वाहतुकीसाठी खुला झाला.