मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा दुसरा बोगदा वाहतुकीस आजपासून (ता. ५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. त्यानंतर २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली.
तब्बल एका वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदा गणेशोत्सव कालावधीत मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आल्याने चाकरमानी आनंदीत झाले आहेत. कशेडी घाटातील वाहतूककोंडीतून यामुळे प्रवाशांची सुटका होणार आहे. ४० मिनिटांचे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे. सद्यःस्थितीत कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यापैकी मुंबईकडे जाणारा बोगदा येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येत आहे; मात्र नव्याने सुरू झालेल्या या बोगद्यात केवळ एकाच मार्गिकचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या बोगद्यातून कोकणात येणाऱ्या वाहनांना उपयोग करता येणार आहे.