मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा सर्वांसाठी पुढच्यावर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरु होणार आहे. तर सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे हा गेले अनेक वर्ष बंद असलेला व आता नव्याने होत असलेला पूल फेब्रुवारीमध्ये वाहतुकीस सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांनी महत्वपूर्ण चर्चा केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कशेडी बोगदा हा फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजूने पूर्णपणे सुरु केला जाणार असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर सागरी महामार्गावरील दांडे-अणसुरे हा पूलही गेली अनेक वर्ष नादुरुस्त होता. त्यातील काही भाग पूर्णपणे काढून टाकण्यात आला होता. हा पूल खचल्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु असून फेब्रुवारीमध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरु होईल, असे ना. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
या पुलामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा जोडला जाणार असून मालवण कुणकेश्वर, देवगड यांना रत्नागिरी जिल्हा सर्वाधिक जवळचा पडणार आहे. हे दोन्ही महत्वाचे टप्पे फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याने विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. कशेडी बोगदा सुरु होणार असल्याने मुंबईहून रत्नागिरीसह गोव्याला जाणाऱ्या अनेक पर्यटकांना याचा चांगला फायदा होईल. त्याचा अमूल्य वेळ वाचणार आहे. तसेच गोव्याकडून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनाही कशेडी घाटातून प्रवास करताना येणाऱ्या अडीअडचणी हा बोगदा सुरु झाल्याने दूर होण्यास मदत होईल.