बोलेरो पिकअपगाडीतून विनापरवाना चार जनावरे कोंबून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी २४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता तालुक्यातील हर्चे- बेनी फाटा येथे करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साटवली गांगोवाडी येथून बेकायदेशीररित्या जनावरांची विक्री केली जात असल्याची माहिती फिर्यादी अभिषेक सुरेश तेंडुलकर (३५ वर्षे, रा. भडे पेवखलवाडी, ता. लांजा) यांना मिळाली होती. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
संशयित आरोपी अंजय नारायण तरळ (४३ वर्षे) आणि संदीप राजाराम जाधव (३५) वर्षे, दोघेही राहणार साटवली गांगोवाडी हे बोलेरो पिकअप या गाडीतून हर्चे तांबेवाडी येथील विठ्ठल धोंडू शिरसेकर (६६ वर्षे) यांच्या गोठ्यातून चार जनावरे घेवून मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता हर्चे बेनीफाटा येथे रोडवर आढळून आले. या बोलेरो पिकप गाडीत दाटीवाटीने जनावरांना वेदना होतील अशा पध्दतीने साटवली गांगोबाडी येथे विनापरवाना वाहून नेण्याचा प्रयत्न केला असताना गाडीत मिळून आले. यामध्ये २२ हजार रुपये किंमतीची चार जनावरे आणि चार लाख रुपये किंमतीची सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, गाडीतून जनावरे वाहून येण्याचा. कोणताही परवाना नसताना आपल्या गाडीत जनावरे भरून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी तिघां विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (फ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, मोटर वाहन कायदा क्रं. ६६/१९२, भा.द.वि.क. ३४ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड. कॉन्स्टे. तेजस मोरे हे करत आहेत.