या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर आस्थापना मंडळ गठित केले होते. ज्याचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे होते. तसेच सदस्य म्हणून अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व प्रभारी पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) रत्नागिरीच्या राधिका फडके, सदस्य सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रद्धा तळेकर यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षकांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा पसंतीक्रम जाणून घेतला. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनावरील सहायक पोलिस फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या त्यांच्या समक्ष पारदर्शक, तसेच समुपदेशनाद्वारे बदली करता दिलेल्या पसंती क्रमांकाचा प्रशासकीयदृष्ट्या विचार करून केल्या.
यातील प्रशासकीय बदल्यांमध्ये सहायक पोलिस फौजदार ३०, पोलिस हवालदार-७२, पोलिस नाईक-४, पोलिस शिपाई-११३, तर चालक संवर्गातील बदल्यांमध्ये पोलिस हवालदार-१५, पोलिस नाईक-१, पोलिस शिपाई-११ आणि आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पोलिस हवालदार-१, पोलिस नाईक-२ व पोलिस शिपाई-९ अशा बदल्या करण्यात आल्या.
त्या त्या ठिकाणी रुजू होण्याच्या हालचाली – बदली झालेल्या पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रुजू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आपल्या हातातील असलेली प्रलंबित कामे पूर्ण करून पदभारमुक्त होण्याची लगबग पोलिस ठाण्यात पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर बदलीच्या ठिकाणी मुलांच्या शाळा, महाविद्यालयातील प्रवेशाचेही टेन्शन संबंधित पोलिसांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे.