रत्नागिरी मधील कोरोना रुग्णाच्या वाढत्या प्रमाणाची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने अजून आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरीही काही जण विनापरवाना सुद्धा प्रवास करताना आढळले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
रत्नागिरी मध्ये कडक लॉकडाऊन केलेला असताना इतर जिल्ह्यातून फक्त अत्यावश्यक सेवा असतील तरच प्रवेश दिला जात आहे. मुंबई – गोवा महामार्गावरुन रत्नागिरी मध्ये दाखल होणाऱ्या स्वयंभू आराम बस मालक आणि चालकावर कायद्याचे उल्लंघन करून विनापरवाना जिल्ह्यात दाखल झाल्याबद्दल खेड पोलिसांनी कारवाईची बडगा उगारला आहे. या आरामबसमध्ये एकूण २९ प्रवाशी प्रवास करत होतेत, कोविडच्या नियमावलीनुसार प्रवासी वाहनांनी सुद्धा निम्म्या आसन क्षमतेसह प्रवाशांची वाहतूक करायचे असे सांगण्यात आलेले असून सुद्धा, निम्म्या पेक्षा जास्त क्षमतेने या बसमध्ये प्रवाशांची संख्या होती, त्यामुळे खेड पोलिसांनी बस गोळीबार मैदानात नेऊन, त्यातील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
चालक आणि प्रवासी कोणाकडेही कोरोना चाचणी केल्याचा अहवाल नव्हता. पोलिसांनी केलेल्या चाचणीमध्ये एका प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्याला त्वरित शिवतेज कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारांकरिता दाखल करण्यात आल्याचे खेड पोलिसांनी सांगितले. आणि उर्वरित जे २८ प्रवासी होतेत, त्यांना विशेष बसने आपापल्या गावी पाठविण्यात आले. स्वयंभू आरामबस जप्त करण्यात आली असून कोरोना निर्बंधित कायद्याचे उल्लंधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी आपल्या कर्तव्याबद्दल दाखवलेली कार्यचतुरता नक्कीच कायद्याला अनुसरून आहे, पण त्यातील एक सकारात्मक गोष्ट अशी कि, खेड पोलिसांनी जरी कर्तव्य म्हणून कार्यवाही केली असली तरी बसमधील सर्व प्रवाशांसाठी त्यांनी चहा-बिस्कीटची व्यवस्था केली. त्यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव उपस्थित होत्या.