कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा रेवस ते रेडी सागरी महामार्ग किनारपट्टीवरील काही गावांमधून जाणार आहे. त्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चार मार्गिकांऐवजी दोन मार्गिका प्रस्तावित करण्याबाबत पुनर्विचार करण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री पवार यांनी सांगितले. पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरू आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा.
विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग यूनिटच्या-पीएमयू) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव (व्यय) ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी सागरी महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा रेवस ते रेडी किनारा महामार्ग किनारपट्टीवरील काही गावांतून जातो. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चार मार्गिकांऐवजी दोन मार्गिका प्रस्तावित करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या आहेत. दरम्यान, मेरिटाईम बोर्डामार्फत नौका वहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रूंदीसाठीचे नाहरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची कार्यवाही रखडली होती. नव्याने या मार्गाची आखणी करताना मेरिटाईम बोर्डाने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रूंदीसाठीचे नाहरकत प्रमाणपत्र प्रलंबित होते; मात्र आता नव्याने आखणी करताना या कामातील अडसर दूर होण्याची चिन्हे आहेत.