येथील दोन कात कंपन्या ७२ तासात बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. भट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी दूषित होऊन शेतीचेही मोठे नुकसान होत होते. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. सावर्डे येथील कातभट्टीच्या जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना होत होता. कातभट्टीचे पाणी नाल्यातून थेट नदीमध्ये जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली होती. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. तसेच येथील बोअरवेल आणि विहिरींना प्रदूषित पाणी येते होते.
यासंदर्भात अनेकवेळा आवाज उठवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर ग्रामस्थांनी त्यांची व्यथा भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे मांडली. नीलेश राणे यांनी सावर्डे, भुवडवाडी येथे अधिकाऱ्यांना बोलावून तेथील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्री आणि तिरुपती कात इंडस्ट्री या दोन्ही कंपन्या असणाऱ्या परिसरातील व गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली. त्याचे तपासणी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केले. यात या कात भट्ट्यांमुळे प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे या दोन्ही कात कंपन्यांचे उत्पादन ७२ तासांच्या आत बंद करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित विभागांना पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या. या लढ्याला पाठबळ दिल्यामुळे ग्रामस्थांनी नीलेश राणे यांचे आभार मानले आहेत. याबाबत कंपनीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकलेला नाही आणि प्रतिक्रियाही मिळालेली नाही. दरम्यान, या आदेशाबाबात संबंधित विभागाकडे दाद मागितल्याचे समजते.