वाहतुकीचे नियम आधी पेक्षा कडक केले असल्याने, नाक्यानाक्यावर उभे असणारे ट्राफिक पोलीस प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवून असतात. त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्या सर्व वाहन चालकांवर पोलीस आणि सीसीटीव्ही वरून करडी नजर ठेवत आहेत. परंतु, काही चालक बेशिस्तपणे वागून उलट पोलिसांच्या नांवाने ठणठणाट करताना दिसतात. मग पोलीस सुद्धा चांगलाच त्यांना कायद्यानुसार खाक्या दाखवून वठणीवर आणतात.
तालुक्यातील भरणेनाका येथे दि. ७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला पोलिस कर्मचाऱ्याने अडवल्यानंतर त्या तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यासोबतच हुज्जत घालत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्या तरुणाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संपत मच्छिंद्र गीते हे पोलिस कर्मचारी वाहतूक नियमनासाठी भरणेनाका येथे पेट्रोल पंपाजवळ ड्युटीवर होते. त्याचवेळी स्वराज नंदकिशोर गुजराती रा. हेडगेवार कॉलनी ब्राह्मणआळी हा दुचाकी क्र. एम.एच.४३/बी.एस/७०६७ वरून विनामास्क व मोबाईलवर बोलत दुचाकी चालवत आला. पोलीस गीते यांनी त्याला हाथ दाखवून थांबायला सांगितले.
पोलिस गीते यांनी त्यांना कायदेशिर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली असता, स्वराज याने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांना दाखवण्यास नकार दिला. आरडाओरड करून गीते यांना धक्का देऊन, चोर आहेस तू, असे म्हणून दमदाटी केली. थांबवलेली दुचाकी जबरदस्तीने तेथून ते घेऊन पळून जायला लागले.
त्यामुळे एक तर कोविड चा वाढता संसर्ग पाहता, शासकीय कामात अडथळा, कोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असताना विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे या विविध कारणास्तव खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.