मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे कोसळलेला उडाण पुल उभारण्याचे सुरू झालेले काम गेले ९ महिने सुरू आहे. मात्र त्यात प्रगती होताना दिसत नाही. आधी उभारलेल्या पिलरवरील गर्डर तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत या पुलावर केलेला निम्म्याहून अधिक खर्च वाया गेल्यासारखाच असल्याची चर्चा सुरू आहे. पुलाच्या नव्या रचनेनुसार गर्डर तोडल्यानंतर दर २० मीटरवर पिलर उभारून मगच उड्डाणपुलाची रचना केली जाणार आहे. त्यामुळे हे काम नेमके कधी पूर्ण होईल याविषयी साशंकता आहे. महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.
साधारणपणे या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून, बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू झाले होते. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे अतिरिक्त गर्डर पिलर उभारण्याचे काम सुरू असले तरी या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही.