धनशक्तीसमोर जनशक्ती कितपत टिकेल या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नावर रत्नागिरीचे इच्छूक उमेदवार उदय बने यांनी आपण निश्चित निवडून येऊ असा दावा केला आहे. दरम्यान उध्दव ठाकरे यांनी या मतदार संघातून आणखी काही इतर इच्छूक असल्याचे संकेत दिले आहेत, यामुळे उमेदवारी आणखी कोणाला मिळणार याबाबत उलटसुलट अंदाज वर्तविले जात आहेत. चार मतदार संघांसाठी आढावा बैठक पार पडल्या. मात्र चिपळूणची बैठक रद्द करण्यात आली. यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार संघात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती तसेच महत्वाच्या पदाधिकाच्याशी मातोश्रीवर शनिवारी संवाद पार पडला.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी २.१५ ते २.३० अशी पंधरा मिनिटे चर्चा झाली. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मतदार संघाचा आढावा घेतला. यानंतर उपस्थित इच्छूक तिघा उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. धनशक्ती विरोधात आपण लढू शकतो. याआधीही जिल्हा परिषद निवडणुकीत आपण मात दिली आहे. उमेदवारी मिळाल्यास निश्चितपणे निवडून येऊ असा दावा इच्छूक उमेदवार, माजी जि. प. अध्यक्ष उदय बने यांनी यावेळी केला. अन्य इच्छूक उमेदवार असलेले माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मात्र आपण इच्छूक होतो पण आता माघार घेत आहोत असे सांगून टाकले. माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांच्यासोबत चर्चा झाली. याप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे हेही उपस्थित होते.
विधानसभेत भगवा फडकला पाहिजे याची सर्वांनी जाणीव ठेवा असे आवाहन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. यावेळी बोलताना इतरही इच्छूक असल्याचे विधान त्यांनी केल्याने इतरांमध्ये नेमके कोणाचे नाव आहे याचे उलटसुलट अंदाज वर्तविले जात आहेत. नुकतीच भाजपचे नेते बाळ माने यांनी मातोश्रीवर भेट दिल्याचे म्हटले जात होते. इतरमध्ये हेच नाव तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान दिवसभरात दापोली, गुहागर, राजापूरसाठीच्या मुलाखती व आढावा बैठका पार पडल्या. मात्र अचानकपणे चिपळूण मतदार संघासाठीची आढवा बैठक रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हा मतदार संघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आल्यांचे संकेत प्राप्त होत आहेत.