उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येरवडा पुणे येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेला भेट दिली. त्या प्रसंगी बोलताना, डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सदरच्या भेटी दरम्यान कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, उपकुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, शिक्षण संचालक धनराज माने, माजी कुलपती जी. बी. देगलूरकर आदी उपस्थित होते.
श्री. सामंत पुढे म्हणाले, महाविद्यालयातील ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा अमूल्य असून तो जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे. या ऐतिहासिक ठेव्याचे डिजीटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. संगणकीय यंत्रणेसाठी शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. परिसराचा विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा.
मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करुन डेक्कन महाविद्यालयाचा परिसर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथे अनेक संस्था आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अनेक इतिहासकालीन आठवणी जागवणारी स्थाने आहेत जिथे कायमच पर्यटकांची गर्दी झालेली असते.
यावेळी श्री.सामंत यांनी पुरातत्व संग्रहालय, प्रोगैतिहासिक विधीका, मराठा संग्रहालय, जमखिंडी संस्थान संग्रह, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी असतांना वास्तव्य असलेल्या खोलीस भेट देवून पहाणी केली. आणि तेंव्हाच त्यांच्या मनात हि संकल्पना आली कि, हा ऐतिहासिक ठेवा आत्ताच्या पिढीला सुदधा माहित होणे गरजेचे आहे.