25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraमहाराष्ट्र मोदी-शहांच्या हातात जावू देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र मोदी-शहांच्या हातात जावू देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

एक एक विषय ते आपल्या खास ठाकरी शैलीत उलगडून सांगू लागले.

परंपरेप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. लाखोंच्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उप‌स्थित होते. परंपरेप्रमाणे शस्त्रपूजन करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे, आ. भास्करराव जाधव, खा. अरविंद सावंत, नितिन बालगुडे पाटील, सुषमा अंधारे यांच्यासह सारे पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी यावेळी प्रथमच आदित्य ठाकरेंचे दसरा मेळाव्यात भाषण झाले.

चिरपरिचित साद – जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनिनो अशी चिरपरिचित साद घालत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे भाषण खुलू लागले. एक एक विषय ते आपल्या खास ठाकरी शैलीत उलगडून सांगू लागले. काही वेळातच त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

लढवय्या मन – उद्धव ठाकरे म्हणाले की, सुरुवातीला मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो… आताच आपण शस्त्रपूजन केले. प्रत्येकाकडे वेगळ शस्त्र असतं. कुणाकडे तलवार असते, कुणाकडे ढाल असते कुणाकडे अन्य काही असते. आपल्याकडे लढवय्या मन हे शस्त्र आहे. शिवसेनाप्रमुखांचा सुपुत्र म्हणून मी त्यांचा कुंचला हाती घेतो आहे. त्याच्या फटकाऱ्यांनी शिवसेना प्रमुखांनी अनेकांना सरळ केले. चेतना पेटवली. शिवसैनिक घडविले. त्यामुळे तुम्ही माझे शस्त्र आहात. तुमची मी पूजा करतो असे उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणताच टाळ्यांचा पाऊस पडला. तुम्ही माझे बळ आहात. या लढाईत आई जगदंबेप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलाते म्हणून ही लढाई मी लढतो आहे. कितीही स्वाऱ्या येवूद्यात… तुमच्या बळावर मी त्या गाडणार… भगव्या मशाली पेटल्या आहेत. प्रत्येक शिवसैनिकच मशाल बनला आहे. भ्रष्ट्राचारी सरकारला तो चूड लावणार आहे असे त्यांनी सांगितले.

टाटांची आठवण – पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी कै. रतन टाटा यांची आठवण सांगितली. तसा टाटांना मी अनेकवेळा भेटलो आहे. पण एक आठवण मुद्दामहून सांगतो, बाळासाहेब गेल्यानंतर ते घरी आले होते. सांत्वनं करायला. जाता जाता ते म्हणाले की उद्धव तुला आणि मला एक समृद्ध वारसा लाभला आहे. माझी निवड जे.आर.डी टाटांनी केली आहे. तर तुझी निवड बाळासाहेबांनी केली आहे. जेव्हा जे.आर.डींनी माझी निवड केली तेव्हा त्यांनी माझी कार्यशैली पाहिली, विश्वास वाटला तेव्हाच जबाबदारी दिली. तुझेही तसेच आहे. बाळासाहेबांनी विचार करूनच तुझ्याकडे जबाबदारी सोपवली आहे. तुला जे योग्य वाटेल तेच तू कर.

विचार सोडले नाहीत – मी. बाळासाहेबांचा वारसा चालवतोय. त्यांचे विचार कधी सोडले नाहीत. हिंदूत्व तर नाहीच नाही. ते भाजपवाले म्हणतात की मी हिंदूत्व सोडलं त्यांना म्हणू द्यात… त्यांचं हिंदूत्व गोमुत्रधारी आहे. असं संकूचित हिंदूत्व माझं नाही. हिंदूत्वाची धगधगती मशाल हाती घेवून मी लढतो आहे. बरोबर आहे ना? हो की नाही सांगा? समोरून हो असा आवाज येताच मग जावून सांगा त्या मिंधेला… तुझे विचार बाळासाहेबांचे नाहीत. दिल्लीपुढे शेपूट घालणारा मी नाही. मी कुत्र्याचाही आदर करतो. शेपूट हालविणारे हे लांडगे आहेत. लांडग्यांचा मी कधीच आदर करू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.

लढाई सोपी नाही – ही महाभारताची लढाई आपण लढतो आहोत. ती सोपी लढाई नाही. महाभारताचा संदर्भ मी ऐवढ्याचसाठी देतो की जेव्हा १०० कौरव माजले होते तेव्हा ५ पांडवांनी त्यांची मस्ती उतरवली. तेच काम आता आपण करत आहोत. आपल्याशिवाय कोणी नाही… असूच शकत नाही… देशात दूसरा कुठला पक्षच ठेवायचा नाही ही भारतीय जनता पक्षाची मस्ती आपल्याला उंतरंवायची आहे. भाजपची वृत्ती लांडग्याची वृत्ती आहे. आम्ही तुमचं काय वाकड केलय असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली. ज्यांच्या जिवावर वाढलात… ज्याच्या खांद्यावर बसून साऱ्या महाराष्ट्रात पसरलात त्यांनाच संपवायला निघालात. मित्राला संपवायला निघालात..

महाराष्ट्र बेईमानी करणार नाही. महाराष्ट्राचे ते संस्कार नाहीत. समोर उभा राहतो तो शत्रु आणि सोबत उभा राहतो तो मित्र असे आमचे रोखठोख गणित आहे. मस्ती कराल तर महाराष्ट्राचा इंगा दाखवूनच देवू अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला. आज दसरा. रामाने रावणाचा पराभव केला म्हणून दसरा साजरा केला जातो. प्रभू श्री रामांसोबत वानरसेंना होती. आज माझ्यासोबत तुम्ही आहात म्हणून ही लढाई मी लढतोय असे देखील ते म्हणाले.

छत्रपतींचे मंदिर उभारणार – जसे प्रभू श्रीराम आमचे आदर्श आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजही आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांचे नाव केवळ सत्तेसाठी आणि मते मिळविण्यासाठी नाही… शिवाजी महाराजांचा पुतळा – तुम्ही उभारलात… त्यातसुद्धा पैसा खालात म्हणून ८ महिन्यात पुतळा पडला. कारण तुमच्यासाठी महाराज म्हणजे मते मिळविणारे एटीएम होते. आमच्यासाठी ते आदर्श आहेत. आम ची सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. महाराष्ट्रात तर ते उभारेनच देशातील अन्य राज्यातही अशी मंदिरे उभी राहतील यासाठी प्रयत्न करेन असे वचन उद्धव ठाकरेंनी दिले.

संघाला काही सवाल – नागपूरमध्ये शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा झाला. त्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण झाले. तो धागा पकडत उद्धव ठाकरेंनी भागवतांना काही सवाल केले. संघाने आता १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. मला संघाविषयी नितांत आदर आहे. मोहन भागवत यांच्याविषयीही माझ्या मनात आपूलकीची आणि आदराची भावना आहेत. मला काही प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरे मोहन भागवतांनी द्यावीत अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. मोहन भागवत त्यांच्या भाषणात म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले. याचे कारण हिंदू संघटीत नाहीत. हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत तरी ते हिंदूंचे संरक्षण करू शकत नाहीत? मग मोदी हवेत कशाला? बांगलादेशवर भागवत बोलले… हे लेकी बोले सुने लागे असे तर नाही ना असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तुमच्या अडी अडचणींच्या काळात जिवाला जीव देणाऱ्या मित्राचे सरकार जेव्हा खाली खेचले तेव्हा भागवतांना काय वाटले. शकुनीमामांनी सरकार पाडले ते भागवतांना मंजूर आहे का? आजच्या बदललेल्या भाजपाविषयी संघाचे काय मत आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

आरक्षणाचे काय ? – भाजपवर उद्धव ठाकरेंनी अक्षरशः शाब्दिक वार केले. आरक्षणाचे गाजर दाखविलेत. ९५ ला जेव्हा सत्ता होती तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेंयींनी सोलापूरच्या सभेत धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? धनगर समाज असो किंवा मराठा समाज आजही प्रश्न सुटलेला नाही. कारण तुम्हाला तो सोडवायचा नाही. आरक्षणाच्या नावावर जाती जातीत पूट पाडण्याचे, भांडणे लावण्याचे राजकारण भाजप खेळतो आहे. भेदाभेद गाडून मराठी माणसाची एकजूट दाखवा असे आवाहन याच शिवतिर्थावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केले होते त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी उभारलेली ही मराठी माणसाची एकजूट भाजपच्या पाठीशी उभी केली नसती तर मोदी आज पंतप्रधानच झाले नसते.

भाजपवर चौफेर हल्ला – मुंबईतील धारावीचा विकास अदानींना करण्याचे टेंडर दिल्याबद्दल भाजपवर त्यांनी टीका केली. अनेक विषयांवर चौफेर टीका करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचे अक्षरशः वाभाडे काढले. या भ्रष्ट्राचारी आणि भाडोत्री जनता पक्षासोबत लढण्याची शपथ घ्या असे आवाहन त्यांनी केले. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात म हिलांच्या मंगळसुत्राविषयी भाष्य केले होते. त्यावरून टोला लगावताना उद्धव ठाकरेंनी अदानींच मंगळसूत्र आमच्या म ाय भगिनींच्या गळ्यात बांधणार आहात का असा सवाल करत प्रखर टीका केली. काय काय अदानींना देणार? शाळा, खाणी, धारावितील झोपडपट्टी, विमानतळ, मिठागर असं काय काय गिळंकृत करणार आहात असे सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली.

शिवसैनिकांना शपथ – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमि वर भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी त्यांनी २०१९ मध्ये याच मंचावर जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्याची चित्रफित दाखविली. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांना लढण्याची शपथ देत त्यांनी भाषण संपविले. अन्यायाविरूद्ध लढण्याची आणि म हाराष्ट्र जिंकण्याची शपथ त्यांनी दिली आणि भाषण संपविले.

RELATED ARTICLES

Most Popular