१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात मूळ याचिकेसंदर्भात पुरवणी असा एक अर्ज सादर केला होता. महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. तसेच ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना चिन्ह देताना अट घालण्यात आली तशाप्रकारचा निर्णय धनुष्यबाणाबाबतही द्यावा, अशी विनंती या पुरवणी अर्जाच्या माध्यमातून कोर्टाला केली होती. या तातडीच्या पुरवणी अर्जाची दखल कोर्टाने घेतली. मात्र त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. मूळ याचिकेवरच ऑगस्टमध्ये निकाल देऊ, असे न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती सुप्रीम कोर्टातील जेष्ठ वकिल अॅड. सिध्दार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. हा उध्दव ठाकरेंना एकप्रकारे दिलासा असल्याचे मानले जात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी धुनष्यबाण निशाणी उध्दव ठाकरेंना मिळू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आज कोर्टात काय झाले? – उध्दव ठाकरेंनी १० दिवसांपूर्वी जी तातडीची याचिका अर्ज स्वरूपात सादर केली होती, त्यावर सोमवारी न्या. सूर्यकांत आणि न्या. जोयमल्या बांगची यांच्या खंडपीठासमोर दुपारी १२.३० वा. सुनावणी सुरू झाली. ठाकरेंच्यावतीने जेष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी, युक्तिवाद केला. त्यांनी तातडीने निकाल द्यावा अशी मागणी केली. मात्र त्यांच्या या म ागणीला एकनाथ शिंदेंचे वकिल मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवादामध्ये विरोध केला.
ऑगस्टमध्ये सुनावणी – ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल आणि शिंदेंचे वकिल मुकुल रोहतगी यांचे प्राथमिक म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या. सूर्यकांत यांनी मुख्य याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय करू, तेच योग्य राहिल, असा मुद्दा मांडला. त्यावर ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारीख मिळावी अशी मागणी केली. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत मी तुम्हांला ऑगस्ट महिन्यातील तारीख कळवतो. ऑगस्टमध्येच या प्रकरणाचा फैसला करू, असे कोर्टाने सांगितले.
ठाकरेंची मागणी काय? – दरम्यान ठाकरेंच्यावतीने जो अर्ज सादर करण्यात आला होता, त्यामध्ये ज्याप्रकारे राष्ट्रवादीच्या याचिकेवर कोर्टाने तात्पुरता निर्णय देत अजित पवारांना पक्षचिन्ह दिले मात्र ते काही अटींवर असल्याचे सांगत त्या अटींना ठळक अशी प्रसिध्दी दिली जावी, असे आदेश दिले होते. तसेच धनुष्यबाणाबाबत द्यावेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
उध्दव ठाकरेंना दिलासा? – सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना जेष्ठ वकिल सिध्दार्थ शिंदे यांनी सांगितले की, उध्दव ठाकरे यांनी केलेल्या अर्जावर सोमवारी कोर्टात सुनावणी झाली. न्यायाधिशांनी मुख्य याचिकेवरच आपण सुनावणी घेवूया, असे सांगत पुढील दोन- तीन दिवसांत ऑगस्टमधील सुनावणीची तारीख आपण देऊ, असें कोर्टाने सांगितले. याचा अर्थ ऑगस्टमध्ये सुनावणी पूर्ण झाली तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या प्रकरणावर निर्णय येऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी धुनष्यबाणाचा निर्णय झाल्यास तो उध्दव ठाकरेंसाठी दिलासा ठरू शकतो, असे अॅड. सिध्दार्थ शिंदे यांनी सांगितले. दोन वर्ष हा खटला सुरू आहे. त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावायचा आहे, असे संकेत कोर्टाने दिले आहेत, असेदेखील अॅड. सिध्दार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्याचप्रमाणे मुख्य याचिकेवरच सुनावणी होईल, पुरवणी अर्ज सादर करणे बंद करा, असेही कोर्टाने म्हटले आहे.
सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये निकाल? – ऑगस्टमध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांसाठी निकाल राखून ठेवला जाऊ शकतो. तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येवू शकतो, असा अंदाज असून उध्दव ठाकरेंना हा दिलासा असू शकतो, अशी टिप्पणीही सुप्रीम कोर्टातील जेष्ठ वकिल अॅड. सिध्दार्थ शिंदे यांनी दिली आहे. दोन वर्ष सुरू असलेल्या खटल्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता कोर्टाने आता दूर केली आहे. ऑगस्टमध्ये सुनावणी होऊन काही दिवसांमध्ये निकाल मिळेल, हा एकप्रकारे ठाकरेंना दिलासा मानला जात आहे.