मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये मे.गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून १०० कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं.
संजय राऊत हे सध्या १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. जून महिन्यामध्ये ईडीने PMLA खाली संजय राऊत यांना अटक केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सध्या आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांची भेट घ्यायची आहे. संजय राऊत यांची जेलर कार्यालयात भेट घेता येईल का? अशी ठाकरे यांच्या कार्यालयाकडून आर्थर रोडच्या जेलरना विचारणा करण्यात आली आहे. यावर कोर्ट प्रोसिजर फॉलो करा, असं उत्तर आर्थर रोड कारागृहाच्या अधिक्षकांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाला दिलं आहे.
इतर कैद्यांना जशी भेटण्यास परवानगी मिळते तशी परवानगी केव्हाही देण्यास कारागृहाच्या प्रशासनाने होकार कळवला आहे, पण उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांची स्वतंत्र भेट हवी आहे. जर स्वतंत्र भेट हवी असेल तर कोर्ट परवानगी आवश्यक असल्याचं कारागृह प्रशासनाने ठाकरे यांच्या कार्यालयाला कळवलं आहे. या नियमानुसार उद्धव ठाकरे कोर्टात स्वतंत्र परवानगीसाठी अर्ज करू शकतात.