मागील तीन वर्षे वादग्रस्त ठरलेले दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर मालक सदानंद कदम स्वतःहून पाडण्याचे काम हाती घेतले आहे. सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टमधील भिंती पाडण्याचे काम बुधवारी हाती घेतले आहे. बुरोंडीचे मंडळ अधिकारी शरद सानप यांनी सदानंद कदम यांच्याविरोधात १४ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये तक्रार दाखल केली होती. मुरूड समुद्र किनाऱ्यावर सदानंद कदम यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
या रिसॉर्टचे बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. साई रिसॉर्टवरील कारवाई प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून सदानंद कदम यांनी परवानगीपेक्षा जास्त केलेले बांधकाम आपण स्वतःहून तोडून टाकू असे शपथपत्र न्यायालयात दिले होते. त्यानुसार त्यांनी स्वतःहून अनधिकृत भाग तोडण्यास सुरवात केली आहे. रिसॉर्टवर कारवाई व्हावी, यासाठी किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सीआरझेड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. ते जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही भेटले होते.
मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना केवळ सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले नाही, तर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला होता. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला. त्यासाठी अधिकाऱ्यांना अवैध परवानगी देण्यास भाग पाडले, असाही आरोप सोमय्या यांनी केला होता.
अनिल परब यांच्यावर आरोप – साई रिसॉर्टशी उद्धव ठाकरे गटाचे नेते तत्कालीन पालकमंत्री आमदार अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेकदा केला होता. मात्र आपला या रिसॉर्टशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अनेकदा अनिल परब यांनी दिले होते. कदम यांनी अनधिकृत बांधकाम पाडायला घेतले.