मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील बनत चालला असल्याने आणि त्यामुळे गुरांसह नागरिकांचाही बळी जाऊ लागल्याने संतप्त राजापूरकरांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाक्याजवळ एकत्र येत जोरदार घोषणा देत निदर्शने केली. आंदोलनाची दखल घेत राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे आंदोलनस्थळी येताच आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी त्यांना सादर केले. दरम्यान याबाबत लवकरच आ. किरण सामंत यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. शहरासह तालुक्यात सर्वत्रच मोकाट गुरांचा प्रश्न व त्यामुळे निर्माण झालेली भीती आणि प्रसंगी होणारे अपघात याची दहशत. असताना सोमवारी राजापूरच्या महामार्गावर आंदोलन छेडण्यात आले. विशेष म्हणजे स्थानिकांना एकत्रित करून यामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षातील स्थानिक पुढारी एकवटले होते. त्यामुळे याची दखल स्वतः पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घेत ते आंदोलनस्थळी पोहोचले होते.
मोकाट गुरांचा प्रश्न शहरातही मोठ्या प्रमाणावर असताना किमान या प्रश्नी महामार्गाच्या समस्येवर वाचा फुटली. याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान भाजपचे पदाधिकारी विवेक गुरव यांनी शहरातील मोकाट गुरांना आसरा देण्यासाठी मोफत जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. नगर परिषदेने बाकीचे सोपस्कार करावे असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबई-गोवा महार्गावर राजापूर तालुक्यात वाटूळपासून ते पुढे हातिवले टोलनाका ते पन्हळे टाकेवाडी खारेपाटणपर्यंत मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात मुकी जनावरे जखमी होत आहेत व मृत्युमुखीही पडत आहेत. अपघात होऊन वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा व अशा प्रकारे गुरे मोकाट सोडणाऱ्या गुरांच्या मालकांवर कारवाई करावी व महामार्गावरील प्रवास हा सुरक्षित करावा, अशी मागणी होती. आंदोलनकर्त्यांची यासाठी स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वाहनचालक व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आपली गुरे मोकाट सोडून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गुरांच्या मालकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे एक लेखी निवेदन स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना यांच्यावतीने महामार्ग विभागाचे अधिकारी व राजापूर पोलीसांना देण्यात आले. याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, भाजपाचे पदाधिकारी दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, तसेच संदीप राऊत, प्रतीक सप्रे, कोदवलीच्या सरपंच प्रणोती भोसले, हातिवले सरपंच नाना गोटम यांच्यासह कोंडये सरपंच तसेच जुवाठीचे प्रसाद मोहरकर, पेट्रोल पंप व्यावसायिक प्रशांत जोशी, नाना पवार, दीपक घालवलकर, अजित घाणेकर आदींसह हातिवले व कोंडये येथील रिक्षा चालक मालक संघटना पदाधिकारी व रिक्षा व्यवसायिक, वाहनचालक तसेच परिसरातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, या भागातील वाहनचालक उपस्थित होते.