भाजपा प्रवेशाचा मुहूर्त हुकल्यानंतर वैभव खेडेकर यांच व्हाट्सअॅप स्टेटस सोशल मिडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. ‘तुमच्या जिद्दीसमोर चक्रव्यूह सुद्धा फिका पडेल, राजकारणात थोडा उशीर झाला तरी जनतेचे प्रेम कायम तुमच्या पाठीशी तूर्तास रोखला, अशीही चर्चा सुरू आहे. वैभव खेडेकर हे कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून गेल्या काही वर्षात चांगलेच प्रसिध्द झाले. खेडची नगर परिषद निवडणूक जिंकत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचा मान पटकावला. थेट नगराध्यक्ष म्हणूनही ते निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने त्यांनी केलेली आंदोलने खूपच गाजली. असे असताना अचानक त्यांचे आणि मनसेचे काहीतरी बिनसले आणि राज ठाकरेंनी त्यांना थेट मनसेतून बडतर्फ केले.
भाजपच्या संपर्कात – वैभव खेडेकर हे भाजपच्या संपर्कात असल्याची कुणकूण राज ठाकरेंना लागली होती. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची बातमी हाती येत असतानाच राज ठाकरेंनी त्यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र प्रसिध्द झाले आणि राजकारणात चर्चांना पुन्हा एकदा पेव फुटले. त्यानंतर वैभव खेडेकर यांनी भाजपचे कोकणातील नेते आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला.
आंदोलनामुळे लांबणीवर – हा प्रवेश ४ सप्टेंबर रोजी होणार होता. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर भाजपचे ‘कमळ’ हाती घेणार होते. मात्र अचानक हा प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. त्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजबांधवांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला असून लवकरच प्रवेश होईल, असे सांगण्यात आले होते.
२३ सप्टेंबरची तयारी – त्यानुसार पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला म्हणजेच २३ सप्टेंबरला वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. वैभव खेडेकरांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार – तयारी केली होती. जिल्ह्यातील त्यांचे शेकडो समर्थक गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला रवानादेखील झालेः स्वतः वैभव खेडेकर मुंबईत दाखल झाले होते.
अचानक प्रवेश लांबला – मात्र काय झाले माहिती नाही, २३ सप्टेंबरला प्रवेश होणार नाही, असे सायंकाळी अचानक सांगण्यात आले. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. प्रवेश नेमका कोणत्या कारणामुळे लांबला? हे समजू न शकल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे. वेगवेगळी कारणे चर्चेत आली आहेत.
मला माहिती होते…. – मंगळवारी पक्षप्रवेश दुसऱ्यांदा लांबणीवर पडल्यानंतर वैभव खेडेकर यांनी दिलेली प्रतिक्रियाही खळबळ उडवणारी आहे. त्यांनी प्रसारमाध्यम ांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ‘मला माहिती होते की, पक्षप्रवेश आज होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते, म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की, वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो. मी भाजपाचे काम सुरू केले आहे. पक्षप्रवेश केवळ औपचारिता आहे, लवकरच ती पूर्ण होईल, असे वैभव खेडेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
लवकरच प्रवेश होणार? – त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लवकरच हा प्रवेश होईल, असे बोलले जाते. मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने अधिकृतपणे प्रवेश का लांबला आणि तो पुन्हा केव्हा होईल? हे सांगितलेले नाही. त्यामुळे चर्चांना पेव फुटले आहे. प्रवेश का लांबला याची वेगवेगळी कारणे चर्चेत आली आहेत.
पक्षांतर्गत वाद ? – वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे. यांनी पुढाकार घेतला होता. ना. राणे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संबंध साऱ्यांना ठाऊक आहेत. मतभेदाची चर्चा आणि वाद जाहीरपणे चर्चेत आले आहेत. अनेक प्रकरणांमधून रविंद्र चव्हाण आणि ना. नितेश राणे यांचे फारसे जमत नसल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षांतर्गत वादातून (?) हा प्रवेश लांबला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापालिका निवडणुका – महापालिका लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक संर्वांत प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. या निवडणुकीची रणनिती सर्वच पक्ष आखत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका भाजप महायुती म्हणून लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी अन्य काही समीकरणेही जुळवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणताही पक्षप्रवेश करू नका, असे आदेश फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले असल्यामुळे वैभव खेडेकर यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू आहे.
मनसेकडून शब्द ? – आणखी एक कारण चर्चेत आहे ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फडणवीसांना प्रवेश रद्द करण्यासाठी शब्द टाकण्यात आल्यामुळे हा प्रवेश होऊ शकला नाही, अशी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांचे संबंध मधुर आहेत. अशावेळी मनसेतून बडतर्फ केलेल्या नेत्याला भाजपने प्रवेश देऊ नये, असा शब्द टाकण्यात आला आणि तो फडणवीसांनी मित्रत्वाच्या नात्याने पाळला, अशी चचदिखील सुरू आहे. कटुता टाळण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
नवा मुहूर्त कधी? – अर्थात या साऱ्या चर्चा आहेत आणि त्या पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर टाकण्याचे नेमके कारण सांगण्यात न आल्याने सुरू झाल्या आहेत. भाजपकडून आता वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची नवी तारीख जाहीर होते का? याकडे लक्ष लागले आहे. दिवाळीनंतर प्रवेश होईल, असे बोलले जात आहे. तोपर्यंत चर्चा तर होणारच….!

