26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeKhedवैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश का लांबला? पडद्यामागे नेमके घडतेय तरी काय याचीच चर्चा

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश का लांबला? पडद्यामागे नेमके घडतेय तरी काय याचीच चर्चा

आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीसाठी महत्वाची आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाचा नवा मुहूर्त कधी निघणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच हा पक्षप्रवेश दोनवेळा लांबणीवर का टाकला याचीही चर्चा सुरू आहे. हा पक्षप्रवेश रोखण्यामागे दस्तुरखुद्द राज ठाकरेंच असल्याची चर्चा सुरू आहेच. त्याच जोडीला भाजपच्या अंतर्गत राजकारणातूनही हा प्रवेश होत नसल्याचे बोलले जाते आहे. पडद्याआड नेमके काय घडते आहे, याची मोठी रंजक चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर रंगली आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे सध्या कौटुंबिकदृष्ट्या एकत्र आले आहेत.. मात्र राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही राजकीय घोषणा झालेली नाही. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीसाठी महत्वाची आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. राज ठाकरे भाजपाबरोबर आल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलल्यांचे बोलले जाते आहे.

जुन्या जाणत्यांचा हात ? – वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश लांबविण्यात भाजपामध्ये असलेल्या काही जुन्या जाणत्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. वैभव खेडेकरांना दापोली मतदारसंघातून भाजपामध्ये प्रवेश दिल्यास ४ वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपा वेगळी लढल्यास वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळेल, ही भीती बाशिंग बांधून असलेल्या काही इच्छुकांना असल्यानेच त्यांचाही हातभार प्रवेश लांबविण्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश लांबवण्यात स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात भाजपच्या स्थानिक पातळीवरून नेत्यांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत हीच बाब बोलकी आहे.

वैभव खेडेकरांचे स्टेटस – दरम्यान वैभव खेडेकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीचा व गाड्यांचा ताफा असलेला व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. ‘दहशत तर डोळ्यात असली पाहिजे.. हत्यार तर हवालदाराकडे पण असते.. असा स्टेटस ठेवला आहे. आयुष्याच्या पुस्तकाचे एक पान काय फाटलं तर लोकांना वाटलं याचा कार्यकाळ संपला आहे, पण महाराज काय सांगतात….. ज्या वेळेला लोकांना वाटते ना आपण संपलोय त्यावेळेस एक बाकी संयमाचा डाव टाकायचा असतो’ असे सांगणारा व्हिडिओ खेडेकर यांनी स्टेटसला ठेवला आहे. मैत्रीत विश्वास असेल तर कोणतीही अडचण लहान वाटते असं सांगत त्यांनी बरोबर असलेल्या पदाधिकारी त्यांचे फोटो ठेवले आहेत.

नातूंनी समजूत घातली? – हा पक्षप्रवेश ४ सप्टेंबर रोजी होणार होता, मात्र तो काही कारणाने रद्द झाला. त्यानंतर आता दुसऱ्यांदा २३ सप्टेंबरचा मुहूर्त ठरला. तोही अचानक रद्द झाला. वैभव खेडेकर यांचा राजकीयदृष्ट्या हा अपमानच झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर या अपमानानंतर खेडेकर यांची समजूत घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विनय नातू यांनीही नुकतीच वैभव खेडेकर यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

प्रवेश निश्चित – दरम्यान खेडेकर यांना तुम्ही काम सुरू करा पक्षप्रवेश लवकरच. निश्चित केला जाईल असा शब्द भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वैभव खेडेकर यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र यामध्ये आता यामध्ये कोणीही कितीही अडथळे आणले तरी खेडेकर माघारी फिरणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

कोणता मुहूर्त? – या पार्श्वभूमीवर भाजपचं काम मी यापूर्वीच सुरू केलं आहे. प्रवेश ही केवळ औपचारिकता आहे, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. यामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी होतो याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular