रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर खासदार राऊत यांनी या प्रकल्पाचा गौरव करत प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख विनोद झगड़े, संघटक राजू देवळेकर, समन्वयक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, सामजिक कार्यकर्ते संतोष उतेकर, प्रशांत मुळये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
यादवांनी केले स्वागत – यावेळी प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्यावतीने खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करताना खासदार राऊत यांनी प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. त्यांनी डेअरीतील आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता, सुरक्षितता, व्यवस्थापन आदी बाबींचे कौतुक केले. मोठ्या दुग्धप्रकल्पात ज्या पद्धतीने विशेष खबरदारी घेऊन उत्पादन घेतले जाते. त्याहीपेक्षा उत्तम प्रकारचे व्यवस्थापन वाशिष्ठी डेअरीत दिसून आले. त्यामुळे निश्चितच हा प्रकल्प संपूर्ण कोकणात एक आदर्शवत प्रकल्प ठरेल, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी कौतुक केले आणि प्रकल्पाच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक अविनाश गुढेकर, महेश खेतले, प्रशांत वाजे, रमण डांगे, व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.