तालुक्यातील रामपूर व खेड तालुक्यातील वावे येथील प्राथमिक केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी निधीही आला आहे; मात्र, जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्यासंदर्भात आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील रामपूर आणि गुहागरमधील आबलोली या ग्रामीण रुग्णालयांसाठी जागा उपलब्धीसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले. या वेळी रामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक ६१ गुंठे जागा तत्काळ देण्याच्यादृष्टीने कार्यवाही होईल, अशी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिली. बुधवारी (ता. २९) सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. भास्कर जगताप, तहसीलदार प्रवीण लोकरे, गुहागर तहसीलदार परिक्षित पाटील, डॉ. ज्योती यादव, घनश्याम जांगीड उपस्थित होते. रामपूर येथे जिल्हा परिषदेच्या नावावर सुमारे ९७गुंठे जागा आहे.
या जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारले जाऊ शकते, असे आमदार जाधव यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित मंडल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेपैकी एकत्रित ६१ गुंठ्यांचा प्लॉट तयार करावा आणि त्याबाबत प्रांताधिकारी यांना तो नकाशा सादर करावा, अशा सूचना केल्या. या जागेमध्ये तलाठी, पोलिस ठाणे, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्यकेंद्र, कर्मचाऱ्यांची वसाहत अशी ९७ गुंठे जागा आहे. या जागेमधून गावातील अंतर्गत रस्ताही आहे. या संदर्भात जाधव यांनी चर्चा केली. या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर झाला आहे. तो निधी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा. जर अंतर्गत रस्ता वळवणे आवश्यक असेल तर त्यासाठी सहकार्य करावे. एकत्रित ६१ गुंठे जागा मिळाली तर हा प्रकल्प उभा राहू शकतो. त्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या आरोग्याची व्यवस्था होऊ शकेल. सुसज्ज वैद्यकीय सेवा निर्माण करता येईल. ग्रामपंचायतीची इमारत ४५ गुंठे जागेत आहे. १५ गुंठे पोलिस ठाण्यासाठी, ४ गुंठे तलाठी कार्यालयासाठी अशी ९७गुंठे जागा असल्याने कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
ग्रामस्थांनी ही जागा रुग्णालयासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी तत्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची बैठक घ्यावी. तालुका वैद्यकीय अधिकारी, तलाठी यांनी समन्वय साधून तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा म्हणजे उपलब्ध निधीतून हे काम होईल, असे सांगितले. या वेळी प्रांताधिकारी लिगाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ मंडल अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले व येत्या दोन दिवसांत याबाबत जागेवर जाऊन पाहणी करावी आणि ६१ गुंठे जागा उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आली. गुहागर तालुक्यातील आबलोली येथेही ग्रामीण रुग्णालय उभारण्याबाबत निर्णय झाला आहे; मात्र, येथेही जागेची अडचण होती. याबाबतही चर्चा झाली. या आरोग्यकेंद्रासाठी ५४ गुंठे जागा उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. जगताप व डॉ. आठल्ये यांनी दिली. या वेळी गुहागर तहसीलदार परिक्षित पाटील यांनी एकूण ७० गुंठे जागा आहे. याशिवाय लगतच ३० गुंठे जागा उपलब्ध होईल, असे जाधव यांना सांगितले.