हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार असरानी (वय ८४) यांचे सोमवारी (ता. २०) निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुतणे अशोक असरानी यांनी अभिनेते असरानी यांच्या निधनाचे वृत्त दिले. गोवर्धन असरानी मूळ नाव असलेल्या या सदाबहार कलाकाराने पाच दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. असरानी यांच्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या अजरामर चित्रपटातील “हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है,” हा त्यांचा संवाद लोकप्रिय झाला. ‘शोले’सह ‘खट्टा मीठा’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. कारकिर्दीच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये असरानी यांनी ‘हेराफेरी’, ‘वेलकम’, ‘हंगामा’, ‘भूलभुलय्या’, ‘मालामाल विकली’ अशा चित्रपटांतून भूमिका केल्या. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला होता.
त्यांनी १९६० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अचूक ‘कॉमिक टायमिंग’ आणि खास अभिनय शैली यांच्यामुळे अनेक चित्रपटांत त्यांच्या वाट्याला भूमिका आल्या. १९७२ ते १९९१ या काळात त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत २५ चित्रपटांत एकत्र काम केले. १९६६ ते २०१३ या काळात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये अनेक विनोदी भूमिका साकारल्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य नायकाचा जवळचा मित्र म्हणून सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. ‘चला मुरारी हिरो बने’ आणि ‘सलाम मेमसाब’ यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य नायकाची व्यक्तिरेखा साकारली. हिंदी चित्रपटसृष्टीसह गुजराती चित्रपटात १९७२ ते १९८४ या काळात ते प्रमुख नायक म्हणून लोकप्रिय होते. कारकिर्दीच्या नंतरच्या टप्प्यात त्यांनी चरित्र भूमिकाही साकारल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

