24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजीएसटी कपातीमुळे खरेदीची 'दिवाळी' मुहूर्ताची संधी

जीएसटी कपातीमुळे खरेदीची ‘दिवाळी’ मुहूर्ताची संधी

दहा टक्के कर कपातीमुळे वाहनांच्या मूळ किमतीत घट झाली आहे.

सरकारने वस्तू आणि सेवा (जीएसटी) करात कपात केल्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीसह जिल्ह्यातील मुख्य शहरांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाहनांची खरेदी झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतील एका वितरकाकडून १९१ चारचाकींची विक्री झाली, तर सुमारे साडेतीनशेहून अधिक बुकिंग झाले. त्याचबरोबर मोबाईल, सोने खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठेत तेजी आहे. दिवाळीपूर्वी सरकारनेही जीएसटी करात कपातीचा घेतलेला निर्णय मध्यमवर्गीयांच्या पथ्थ्यावर पडला आहे. दहा टक्के कर कपातीमुळे वाहनांच्या मूळ किमतीत घट झाली आहे. छोट्या चारचाकी वाहनांवर जीएसटी कमी केल्याने ग्राहकांना सर्वाधिक फायदा झाला. जीएसटी करात कपात केल्याने चारचाकी वाहनासाठी ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत आणि दुचाकी वाहनांच्या दरात १० ते १५ हजारांपर्यंत किमतीत घट झाली. यापूर्वी १२०० सीसी आणि ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल आणि सीएनजी चारचाकीवर २८ टक्के जीएसटी आणि १ टक्के सेस आकारला जात होता.

म्हणजेच एकूण २९ टक्के कर होता, जो सरकारने १८ टक्के केला. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. रत्नागिरीत चारचाकी वाहने विक्री करणारे पाच ते सहा वितरक आहेत. त्यातील एका वितरकाडून सुमारे १९१ चारचाकींची विक्री झाली, तर साडेतीनशेहून अधिक वाहनांची नोंद झाली आहे. उर्वरित वितरकांकडेही वाहने घेण्यासाठी ग्राहकाची गर्दी होती. दुचाकींच्या पाचहून अधिक वितरकांकडेही दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. नवनवीन कंपन्यांचे अत्याधुनिक मोबाईल बाजारात येत असल्यामुळे जुने मोबाईल देऊन नवीन घेण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. त्याचा प्रत्यय या दिवाळीत पाहायला मिळाला.

लाखमोलाच्या सोन्याला मागणी – वाहन खरेदीबरोबरच सोने आणि मोबाईल खरेदीला दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होती. सोन्याचा तोळ्याचा दर १ लाख २९ हजार ५०० रुपये इतका होता. दर वधारलेला असला तरीही लोकांनी बँकांमधील ठेवी मोडून सोने खरेदी केल्याचे पाहायला मिळत होते. भविष्यात सोन्याचे दर अधिक वाढले तर लग्नसराई किंवा सणासुदीसाठी खरेदी करताना भुर्दंड बसू नये याची काळजी ग्राहकांकडून घेतली जात होती. त्यामुळे सोने खरेदीमधून काही कोटीत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular