शहरात जिल्हा परिषदेपासून टाकण्यात आलेली पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन पालिकेसमोर फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. या परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. हा प्रकार आज सलग दुसऱ्यावेळी घडल्यामुळे पाईपच्या दर्जाबाबत उपस्थित केले जाणारे आरोप खरे होतात की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. शहरातील जयस्तंभ येथे आज पुन्हा मुख्य पाईप फुटला. फुटलेल्या पाईपमधून सकाळी साडेसहा वाजल्यापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते. विशेष म्हणजे रत्नागिरी पालिका कार्यालयासमोर हा प्रकार घडूनही वाया जाणाऱ्या पाण्याकडे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले गेले नाही. कालच (ता. १२) पाण्याच्या टाकीतील पाण्याच्या अतिरिक्त पातळीचा पाईपवर काही परिणाम होतो का, याबाबत चाचणी घेण्यात आली होती.
त्यामध्येही पालिका यशस्वी झालेली नाही. पाण्याच्या जास्त दाबामुळे शासकीय रुग्णालयासमोरील पाईप फुटला. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर आज पुन्हा नियमित दाबाने पाणी सोडण्यात आले; परंतु सकाळी पालिकेच्या समोरच पाईप फुटला. जिल्हा परिषदेपासून पालिकेच्या दिशेने टाकण्यात आलेल्या पाईपच्या दर्जाबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. वारंवार पाईप फुटूनही थातुरमातूर उत्तरे पालिकेचा पाणी विभाग देत आहे. जयस्तंभ येथे पाईप फुटल्याने जयस्तंभ परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. पालिकेची नवीन पाणी योजनेची पाईप दररोज फुटत असल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार आहे. संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्याने वारंवार फुटणाऱ्या या पाईप सुमार दर्जाच्या असाव्यात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ठेकेदाराचे बिल थांबवा कीर – सुधारित पाणी योजनेचा दर्जा काय आहे, हे आपल्याला वारंवार फुटणाऱ्या पाइपवरून लक्षात येत आहे. आपण आतातरी जागे झाले पाहिजे. नाहीतर भविष्यात हे भोगावे लागू नये, म्हणून पालिकेने ठेकेदाराचे बिले थांबविले पाहिजे. तरच चांगली योजना पालिकेच्या ताब्यात येईल. अन्यथा आयुष्यभर हे भोगावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली.