मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी संबंधित ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळते याच्यापेक्षा या मतदार संघातून आपला खासदार निवडून जाणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यानी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सामंत म्हणाले की, नव्वदीच्या दशकामध्ये परिवर्तनाच्या लाटेची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरे यांनी राजापूर येथे सभेत रोवली होती. त्यानंतर, कोकणात राजकीय परिवर्तन झाले. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा राजापुरामध्ये रोवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत विजयी करूया. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ यापूर्वी शिवसेनेचा होता. त्यामुळे या वेळी येथील खासदारही निश्चित आपलाच होईल. लोकसभेसाठी या ठिकाणी दीपक केसरकर, रवींद्र फाटक आणि किरण सामंत यांची इच्छुक उमेदवार म्हणून नावे चर्चेत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. उमेदवारीसंबंधित ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तिकीट कोणाला मिळेल याच्यापेक्षा या मतदार संघातून आपला खासदार निवडून जाणे महत्वाचे. आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे वर्चस्व राहणार, असा दावा त्यांनी केला.