पाली बाजारपेठेमध्ये अनेक महिने मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे. येथील बाजार पेठेमधील सेवा रस्त्याचे काम चालू झाले आहे. पण, ते काम अपूर्ण असल्यामुळे सध्या धुळीचा मोठा त्रास व्यापारी, निवासी घरांना सहन करावा लागत आहे. जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून दुचाकी गाडी चालवावी लागत आहेत. त्यात त्या रस्त्यावरून गाड्यांची वाहतूक होत असल्यामुळे पूर्ण रस्ता माती व धुळीने माखलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. त्याचा त्रास दुकानामध्ये येणारे ग्राहक, स्थानिक लोक, रस्त्याशेजारी असणाऱ्या घरातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून जात असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. चालत जाताना बाजूने जाणारी गाडीसुद्धा त्यांच्या अंगावर माती, धूळ उडवून जात आहे. रस्त्याच्या बाजूपट्ट्या खणून ठेवल्याने वाहन व पादचारी यांना अपघाताचा धोका असून, त्या भरण्याची गरज आहे. यावर स्थानिक बाजारपेठेमधील रहिवासी आणि दुकानदारांनी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला लवकरात लवकर सर्व्हिस रोडवर डांबरीकरण करून देण्याची मागणी केली आहे. गटारांचे कामही पूर्ण झालेले नाही. सेवा रस्त्याचे डांबरीकरण व गटारे पूर्ण न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.