येथील शासकीय धान्य गोदामापैकी एक गोदाम जीर्ण होऊन कोसळल्याला दोन वर्षे उलटली असली तरी अद्याप त्या जागेवर नवीन गोदाम उभे राहिले नाही. सरकारी लालफितीच्या कारभाराचा हा नमुना आहे. जीवनावश्यक वस्तू असलेले शासकीय धान्य साठवण्याचे ठिकाण तातडीने उभे राहण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित होते. पण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करून देखील अद्याप नवीन गोदाम उभारणीला गती देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी सरकारकडून येणाऱ्या धान्याची साठवणूक करण्यासाठी शहरातील समर्थनगर येथे दोन धान्य गोदाम यापूर्वी होती. त्या पैकी एक गोदाम जीर्ण होऊन दोन वर्षांपूर्वी ते कोसळले. त्याचा उरलेला भाग मोठी दुर्घटना घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडून टाकला. मात्र दोन वर्षे उलटून देखील गोदामाच्या पुनर्बाधणीसाठी वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणती दखलच घेण्यात आली नाही. ९५ वर्षांच्या लाहोर गोदामाच्या डागडुजीसाठी तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहारासह स्मरणपत्र पाठवण्यात आले होते.
तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे, आमदार योगेश कदम यांनी देखील गोदामाच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा केला होता. २०१० मध्ये लाहोर गोदामाच्या तातडीने दुरूस्तीसाठी २१ लाखांचा, २०१३ मध्ये २४ लाखांचा, तर २०१९मध्ये ५४ लाख ७५ हजार रुपयांची अंदाजपत्रकेही तयार करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण येथील अभियंते यांनी गोदामाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर मोडकळीस आलेला लाहोर गोदाम ८ फेब्रुवारी २०२२ रोजी जमीनदोस्त झाले. सद्यस्थितीत गोदामाची दर्शनी भिंतीचे दगडी चिरे अर्धवटस्थितीत उभे आहेत. गोदामाच्या पुनर्बाधणीसाठी वरिष्ठ पातळीवरून ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे.
९१ लाख ६७ अंदाजपत्रक – खेडमध्ये दोन शासकीय धान्य गोदाम असून, त्या पैकी एक जीर्ण झाल्याने ते पाडून टाकण्यात आले. २०२२ मध्ये त्या ठिकाणी ९१ लाख ६७ हजार रुपये खर्चाचे नवीन इमारतीचे अंदाजपत्रक करून वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले. या गोदामांची क्षमता ५०० मेट्रिक टन असून अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. २०२३ मध्ये गोदाम दुरुस्तीसाठी ८ लाख मंजूर झाले होते. उर्वरित गोदामांची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नीलेश पावसे यांनी दिली.
असे होते गोदाम – ब्रिटिशांच्या राजवटीत शहरातील सैनिकी मुलांच्या वसतिगृहासमोर ४३६८ चौरस फूट क्षेत्रात जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर दगडी चिरा, पत्रे व लाकडांवर सहाय्याने बांधण्यात आलेल्या लाहोर गोदामात १९२७ पासून धान्याचा साठा केला जात होता. या गोदामाची ५०० मेट्रिक टन धान्य साठवणूक क्षमता होती. या गोदामालगतच २२० चौरस फूट क्षेत्रात धान्याची नोंदी ठेवणारे छोटेखानी कार्यालय आहे.