रत्नागिरी पालिकेच्या सुधारित पाणी योजनेतील मुख्य जलवाहिनी तीन ठिकाणी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. आठवडाभरात फुटलेल्या पाईपच्या दुरुस्तीवर पालिकेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे; परंतु या कामाबाबत ठेकेदार किंवा पालिकेला जाब विचारण्याचे धाडस लोकप्रतिनिधींकडून झालेले नाही. सुधारित नवीन पाणी योजनेचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत वादातीत ठरले आहे. सुमारे ५४ कोटींच्या या योजनेचे काम लांबल्याने ते सुमारे ६३ कोटी वर गेले. शहरातील सुमारे ११ हजार नळधारकांना मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर करून ही योजना राबवली; परंतु या योजनेच्या कामाबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी आहेत.
शहरातील जिल्हा परिषद येथील उतारापासून अगदी जयस्तंभापर्यंत टाकलेल्या जलवाहिनीच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी आहेत. हायड्रोलिक चाचणीवेळीही त्या भागातील वाहिन्या फुटल्या होत्या. त्यानंतर हे दुष्टचक्र अजूनही सुरूच आहे. गेल्या आठवड्यात जयस्तंभ येथे जलवाहिनी फुटली. पुढे स्वस्तिक हॉस्पिटलजवळील वाहिनी फुटली. आज (ता. १७) पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर फुटली आहे. एवढ्या टप्प्यात वारंवार जलवाहिनी फुटत असल्यामुळे वापरलेल्या साहित्याच्या दर्जावर आक्षेप घेतले जात आहेत; परंतु याबाबत पालिकेकडून अधिकृत माहिती दिली जात नाही. वारंवार पालिकेमार्फत दुरुस्तीचे काम करून वेळ मारून नेली जात आहे. दुरुस्तीचा हा खर्च पालिका घालणार की ठेकेदाराच्या बिलातून घेणार, असाही प्रश्न आहे.
अडचणींवर मात करत योजना पूर्ण – शहरासाठी मंजूर झालेल्या सुधारित पाणी योजनेच्या फेरमूल्यांकनामध्ये १५.१९ टक्के म्हणजे ८ कोटी दरवाढ केल्यामुळे ५४ कोटींची योजना ६३ कोटीवर गेली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन अपक्ष या विरोधकांनी ३०८ खाली या ठरावाला स्थगिती द्यावी, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरवासीयांची पाण्याची निकडीची गरज लक्षात घेऊन विरोधकांची ही तक्रार फेटाळली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरुद्ध कोकण आयुक्तांकडे दादही मागितली. आयुक्तांनी साडेआठ महिन्यांनंतर ही स्थगिती उठवली, अशा अनेक अडचणींवर मात करत ही पाणीयोजना पूर्ण झाली आहे.