मिऱ्या-शिरगाव निवळी प्रादेशिक पाणीयोजनेचे काम वेगाने सुरू आहे. या योजनेद्वारे १३ गावांमधील ३९ वाड्यांना पाणीपुरवठा होणार आहे. सुमारे १२३ कोटी ३० लाखाची ही प्रादेशिक पाणीयोजना आहे. त्यासाठी वळके येथील धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. पावसापूर्वी ते पूर्ण करून पाणीसाठा करण्याचा जीवन प्राधिकरणाचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेतून शिल्लक राहिलेल्या’ पाईपलाईनची काम व पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाची धडपड सुरू आहे. खेडशी ते डीमार्ट या ४ किमी अंतरात मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या उजव्या की डाव्या बाजूने पाईपलाईन टाकायची यावरून एकमत झालेले नसल्याने प्रश्न कायम आहे. या प्रादेशिक पाणीयोजनेच्या कामाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागला होता.
योजनेअंतर्गत एकूण ३४ टाक्यांची उभारणी होणार आहे. त्यातील काही टाक्यांच्या जागेचा प्रश्न अजूनही कायम आहे. शिरगाव-आडी येथील टाकीचा त्यात समावेश आहे. लवकर तो मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच खेडशी ते डीमार्ट या चार ते पाच किमीच्या अंतरात मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या उजव्या की, डाव्या बाजूने पाईपलाईन टाकायची यावरून एकमत झालेले नसल्याने प्रश्न कायम आहे. वेळवंड गावात ३ किलोमीटर अंतरातील पाईपलाईन टाकण्यावरून ग्रामस्थांच्या काही तक्रारी होत्या. त्यावर देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. १२३ कोटी ३० लाख रुपयांची ही नळपाणी योजना आहे. एकूण १६० कि.मी. अंतराच्या जलवाहिनीपैकी ७० कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीवासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष दिले आहे.
या योजनेमुळे शहरानजीकच्या ३७गावांमध्ये उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. योजनेतून प्रतिदिन माणशी ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मिऱ्या, शिरगाव, नाचणे, खेडशी, मिरजोळे, कारवांचीवाडी, हातखंबा ते निवळी तिठापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गावांचा समावेश यात करण्यात आला आहे. भविष्यातील मागणी विचारात घेऊन आणखी पाण्यासाठी साठरे, ठोंबरेवाडीनजीक दुसरा बंधारा बांधला जाणार आहे. या धरणांवर १३ मीटर व्यास व १३ मीटर खोलीची जॅकवेल उभारली जाणार आहे.